राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कनिष्ठ भावाच्या (दादा) विमान अपघाती निधनानंतरच्या काळातील मनःस्थिती उघड केली आहे. एका भावनिक साक्षात्कारात त्यांनी सांगितले की, तो दिवस आजही त्यांच्या अंगावर काटा आणतो. ‘दादा खरोखरच गेले का?’, अशी भावना मनात येऊन जाते, असे त्या म्हणाल्या.

‘एका सेकंदात सगळं संपलं’
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “दादांची एनर्जी तुम्ही पाहिली आहे. आजही ती आठवली की अंगावर काटा येतो. सकाळी साडेआठ वाजता विमान पडल्याचा तो फोन आला होता. तो दिवस आणि आजचा दिवस – कधी-कधी वाटतं, दादा खरंच गेले का? शेवटची भेट, तो शेवटचा फोन – या सर्व गोष्टी मनात घर करून राहिल्या. एका सेकंदात सगळं कसं संपलं, हे अजूनही समजत नाही.”
त्यांच्या आवाजातील खिन्नता स्पष्ट दिसत होती. विमान अपघाताने त्यांच्या कुटुंबातील आनंद हिरावून घेतल्याची ती साक्ष होती.
बारामतीची परंपरा आणि दादांची भूमिका
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणाचा उल्लेख करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बाबा (शरद पवार) सगळी निवडणूक संपवून बारामतीत यायचे. शेवटची सभा घ्यायचे. तीच परंपरा दादांनी जपली होती. दादा आणि साहेब फॉर्म भरून शेवटच्या सभेला यायचे.”
त्यांनी अधोरेखित केले की, बारामती मतदारसंघात संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे काम करते. “कौटुंबिक विश्वासाची नाती आहेत. कधी काही कमी-जास्त झालं असेल, पण त्यामुळे आमच्या मनात किंवा नात्यात कधीही अंतर आलेलं नाही. भविष्यातही येऊ देणार नाही.” या वक्तव्यातून त्यांनी कुटुंबातील एकजूट अधोरेखित केली.
राहुल कुल यांच्याशी कौटुंबिक संबंध
सुप्रिया सुळे यांनी राहुल कुल यांच्याशी असलेल्या कौटुंबिक संबंधांबद्दलही स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, “मी स्वतः 20 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. निवडणुकीत परस्परविरोधी भूमिका घेऊ, पण निवडून आल्यानंतर भागाचा विकास आणि लोकांची सेवा हेच ध्येय असतं.”
‘दादा गेल्यानंतरची पहिली सभा, मन जड आहे’
दादांच्या निधनानंतर बारामतीतील पहिल्या सभेच्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, “ही दादा गेल्यानंतरची सभा आहे. मला अंतकरणातून खूप दुःख आहे. अत्यंत जड मनाने मी बारामतीला जात आहे. माझा भाऊ गेल्यानंतरची ही परिस्थिती आहे. मनात केवळ दुःख आहे.” त्यांचे हे शब्द सहानुभूतीची लाट उभी करणारे होते.
हे पण वाचा
सामाजिक वादातून माजी सरपंचाची कार जाळली ?
लवांडे यांच्या ‘घुसखोर’ यादीमुळे वारकरी संप्रदायात संताप, अटकेची मागणी
महिला आरक्षणावर सुळेंचा हल्लाबोल
एकीकडे भावनिक असतानाच सुप्रिया सुळे यांनी सरकारवर तीव्र टीकाही केली. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री म्हणतात की महिलांना 33 टक्के आरक्षण देऊ शकतो, पण पक्षात देऊ शकत नाही. भाजपला जर मनापासून महिलांना 33 टक्के आरक्षण द्यायचे असेल तर त्यांना कोणी थांबवलेले नाही.”
त्यांनी लक्षात आणून दिले की, “21 सप्टेंबर 2023 रोजी लोकसभेत एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. 2024 मध्येच त्याची अंमलबजावणी होऊ शकली असती. आम्ही रात्रभर बसायला तयार होतो, पण भाजप का करत नाही? बिल पास झाल्यानंतर अडीच वर्षे ते पडून होते. अमलबजावणी का झाली नाही?”
सुळे यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे उदाहरण देत म्हटले, “ममता बॅनर्जी यांच्या पक्षात 40 ते 50 टक्के महिला खासदार आहेत. भाजपनेही असे केले पाहिजे.”
मुख्यमंत्र्यांशी चर्चेबाबत सुळेंची भूमिका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलावलं तर अतिशय विनम्रपणे आमची बाजू मांडायला जाऊ. त्यांनी त्यांच्या सोयीनुसार वेळ द्यावा.”
पत्रकारांनी मुख्यमंत्री बारामतीला येणार असल्याचे सांगून त्यांची प्रतिक्रिया विचारली. त्यावर सुळे यांनी विनोदी पण निर्धारी शैलीत उत्तर दिले, “खेड शिवापूरला संध्याकाळी 6 वाजता लग्नाला जायचं आहे.” यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेला जाण्याबाबत कोणतीही तयारी नसल्याचे सूचित केले.













