पाच वर्षांपूर्वीच्या फुटीनंतरही शिवसेनेत नवे वाद?
सुमारे चार वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडाने महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्रण पूर्णपणे बदलून टाकले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा मोठा गट बाहेर पडला, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे अवघे १० ते १५ आमदार शिल्लक राहिले. निवडणूक आयोगाने निर्णय देत एकनाथ शिंदे यांच्याच गटाला ‘अधिकृत शिवसेना’ म्हणून मान्यता दिली.
आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची व्याप्ती राज्यभरात विस्तारली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे ५७ आमदार निवडून आले, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले. नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्येही शिंदे गटाने दमदार कामगिरी केली.
पण या यशाच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत मतभेद आणि कुरबुरी कायम आहेत. अलीकडच्या काळात झालेल्या एका घटनेने हे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे.
निमंत्रणावरूनच वादाला सुरुवात
शिंदे शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची ही बैठक होती. बैठकीला माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, काही माजी पदाधिकाऱ्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. यामुळे बैठक सुरू असताना अचानक त्यांनी सभागृहात प्रवेश केला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
सत्कारावरून भडकले वाद
नवनियुक्त जिल्हा संपर्कप्रमुख संजय सोनार यांचा सत्कार करण्याला आजी पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. यावरून दोन गटात बाचाबाची झाली आणि हळूहळू ही बाचाबाची धक्काबुक्कीत बदलली. एका गटातील असंतोष पसरल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली.
माजी आमदारांच्या कामगिरीवरही उठले प्रश्न
या बैठकीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेनेच्या एका गटाने माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या राजकीय कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे जोरदार बाचाबाची झाली आणि शिंदे शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली.
हे पण वाचा
पश्चिम आशियातील तणावामुळे भातातील LPG वर मोठा परिमाण, सुरळीत व्हायला लागतील काही वर्ष… वाचा सविस्तर
गर्भपाताच्या गोळ्याच्या अति सेवनाने तरुणीचा मृत्यू… वाचा सविस्तर
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
ही घटना समोर आल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी शिवसेनेतच अशा पद्धतीने आजी-माजी पदाधिकारी समोरासमोर आल्याने पक्षाच्या अंतर्गत एकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने अद्याप या घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मोठ्या प्रमाणात विस्तार केला असला, तरी पक्षांतर्गत मतभेद पूर्णपणे संपलेले नाहीत, हे बुलढाण्यातील या घटनेने अधोरेखित केले आहे. आगामी काळात शिवसेना नेतृत्व या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.














