निदा खानचा शोध सुरू असताना पतीची धरपकड
नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत घडलेल्या लैंगिक छळवणूक आणि जबरदस्ती धर्मांतराच्या गंभीर प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान ही गुन्हा दाखल झाल्यानंतरही गेल्या २० ते २२ दिवसांपासून फरार होती. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके कार्यरत होती. मात्र, अखेर पोलिसांना या प्रकरणातील एका महत्त्वाच्या आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले आहे.

मुंब्रा येथील घरातच लपून बसली होती निदा?
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. फरार असलेली निदा खान ही गेल्या १२ दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागात आपल्या सासरच्या घरीच वास्तव्याला होती. तपास यंत्रणा तिच्या जवळ येत असल्याची चाहूल लागताच ती चार दिवसांपूर्वी त्या घरातून पसार झाली.
पोलिसांची फिल्मीस्टाइल रेकी
एसआयटी पथकाने शुक्रवारी (दि. १७) सकाळी फिल्मी शैलीत रेकी केली. साध्या वेशातील तीन पोलिस कर्मचारी खोटे नाव सांगून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोईन खान याच्या घरी पोहोचले. मात्र, तोपर्यंत निदा खान व तिचा पती मोईन खान (२७) हे दोघेही तेथून निघून गेले होते.
पथकाने घरापासून दूर वाहन थांबवून पायीच हे घर गाठले. गेल्या चार दिवसांपासून पथक मुंब्रा तसेच भिवंडी ठाण्यात सखोल तपास करत होते. गुरुवारी व शुक्रवारी सकाळी रेकी करून धाड टाकण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती.
पती मोईन खानची चौकशी सुरू
शुक्रवारी दुपारी नाशिक गुन्हे शाखेने मोईन खानला मुंब्रा पोलिस ठाण्यात आणले. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर फरार निदा खानबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. निदाचे पूर्ण नाव निदा मोईन नविद खान (२६) असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
हे पण वाचा
शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू….पत्नीही ठार.. वाचा सविस्तर…
delhi news : दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला! स्पाईसजेट आणि अकासा एअरच्या विमानांच्या पंखांना धडक
निदा खानवर कामावरून हकालपट्टीची कारवाई
निदा खानने मुंबईला बदली करून घेतली होती. त्यानंतर ती पती मोईन खानसोबत मुंब्रा येथे राहत होती. ती टीसीएस कंपनीच्या मालाड येथील कार्यालयात जात होती. मात्र, आता तिला कामावरून काढल्याची नोटीस कंपनीने दिली आहे.
पती मोईन खानने चौकशीत सांगितले की, दोन दिवसांपूर्वी निदाची मावशी नुरी शेख तिला नाशिक येथे घेऊन गेली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक नाशिकमध्ये
या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता, राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक आज चौकशीसाठी नाशिकमध्ये दाखल होणार आहे. पथक घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करेल. महिला अत्याचार व धर्मांतराच्या मुद्द्यांचा आढावा घेतला जाईल.
पीडितांच्या तक्रारी थेट ऐकून घेऊन त्यांची नोंद केली जाईल. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून माहिती गोळा केली जाईल. एसआयटी तपासाच्या प्रगतीचा आढावा आयोगाकडून घेतला जाणार आहे. चौकशीचा अहवाल महिला आयोगाला सादर केला जाईल.














