महाराष्ट्रात एकाच दिवशी तीन धक्कादायक घटना; सोलापूरमध्ये तिघांचा खून, पुण्यात दोन चिमुकल्यांचा बळी
महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक अशा अतिशय दारुण घडामोडी समोर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या प्रकारांत अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

सोलापूरमध्ये रात्रीच्या सुमारास तिघांचा खून
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात ही भीषण घटना घडली. एकाच कुटुंबातील आई, तिची मुलगी आणि मुलाला अज्ञात हल्लेखोराने संपवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
हत्या झालेल्यांमध्ये ४० वर्षीय गायत्री सुधाकर मस्के, त्यांची १८ वर्षीय मुलगी प्रिया मस्के आणि १६ वर्षीय मुलगा शिवराज मस्के यांचा समावेश आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घरात घुसून धारदार शस्त्राने या तिघांवर वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री आणि प्रिया यांचे मृतदेह घराच्या गच्चीवर आढळून आले. तर शिवराजचा मृतदेह बैठकीच्या खोलीतील रक्ताच्या थारोळ्यात सापडला. घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील लोकांची विचारपूस सुरू केली असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
पुण्यातील दोन वेगळ्या घटनांनी हादरविले
भोरमध्ये चार वर्षीय मुलीवर अत्याचार व हत्या
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात एक चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना काल घडली असून यामुळे गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
चाकणमध्ये तीन वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या
या घटनेची बातमी ताजी असतानाच पुण्यातील चाकण भागात आणखी एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला. म्हाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तीन वर्षीय चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करून त्याची गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले.
१६ वर्षीय अल्पवयीन आरोपी ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा बिहार राज्यातील राहणारा एक १६ वर्षीय अल्पवयीन तरुणाने हे कृत्य केले आहे. दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृत चिमुकल्याचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशचे असून कामानिमित्ताने ते चाकण परिसरात वास्तव्यास होते. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
हे पण वाचा
बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच बाजी मारली… वाचा सविस्तर
सर्व घटनांमध्ये पोलिसांची कार्यवाही सुरू
या तिन्ही गंभीर घटनांची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्यांनी गुन्हे नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. सोलापूरमधील तिघांच्या हत्येप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. तर पुण्यातील भोरच्या घटनेचा तपास सुरू असून चाकणमधील आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाईल. या घटनांमुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.











