बुलढाणा: गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या वादग्रस्त पुस्तकाने राज्यभर नवा वाद निर्माण केला आहे. या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आज (मंगळवार, २८ एप्रिल) मोठा राजकीय नाट्य घडणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात येणार असून, आमदार संजय गायकवाड यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे संकेत दिले आहेत. दोन्ही बाजूंनी उचललेली पावले राज्याचे लक्ष वेधून घेत आहेत.

विरोधकांचा मोर्चा, गायकवाड यांच्या घरासमोर पुस्तक वाचन
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज बुलढाणा शहरात मोठा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांचाही सहभाग असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे जाहीर वाचन आयोजित करण्यात आले आहे. आंदोलकांचा मुख्य मुद्दा असा आहे की, ज्यांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिली, त्यांच्याच दारात पुस्तक वाचून दाखवावे.
गायकवाडांची भूमिका काय?
आज होणाऱ्या या पुस्तक वाचनाला आमदार संजय गायकवाड हेदेखील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी भूमिका मांडली.
‘विनयशीलतेने ऐकू, पण…’
गायकवाड म्हणाले, “पोलिसांनी सांगितलेल्या कायद्याचा सन्मान केला. आमचा कार्यक्रम रद्द केला, त्यांचाही कार्यक्रम रद्द झाला. पण परवानगी नाकारल्यानंतरही शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी जे पुस्तक छापले, त्याच्या २० लाख प्रती विकल्या, त्यानंतर पुस्तक वाचायची काय गरज आहे?”
पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही त्या पुस्तक वाचनाला जाणार आहोत. खाली समोर जाऊन विनयशीलतेने बसून सगळे ऐकणार आहोत. जर पुस्तक वाचताना शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला, तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करू. मात्र, जर एकेरी भाषेत महाराजांच्या नावाचा अपमान करत जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला, तर शिवभक्तांना अनावर झाल्याची सगळी जबाबदारी आयोजकांची राहील.”
पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा? गायकवाड यांचे स्पष्टीकरण
गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवरूनही चर्चा रंगली होती. मात्र, याबाबत संजय गायकवाड यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “अशी कोणतीही मागणी मी केलेली नाही. लेखीही केलेली नाही आणि कोणत्याही माध्यमातून अशी मागणी केलेली नाही.” त्यामुळे या प्रकरणी त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.
‘मंडप दहशतीने हटवला’ आरोपावर गायकवाडांचे प्रत्युत्तर
आमदार संजय गायकवाड यांच्या दहशतीमुळे पुस्तक वाचनासाठी उभारण्यात आलेला मंडप काढून टाकण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यावर गायकवाड यांनी टोमणे झोडत उत्तर दिले.
हे पण वाचा
गुप्त धनाच्या लालसेचा खेळ, खड्ड्यामुळे गावात भीतीचे वातावरण .. वाचा सविस्तर
मुंबईत कलिंगडाने घेतले एकाच कुटुंबातील चार बळी?
‘कोल्हापुरच्या लांडग्याची कुईकुई’
गायकवाड म्हणाले, “आमची कुठलीही दहशत नाही. एखादा कोल्हापूरचा लांडगा इकडे येईल, इकडे येऊन ‘कुई कुई’ करेल, गावात आग लावेल आणि विनाकारण कायदा व सुव्यवस्था बिघडवेल, असं त्या मंडप चालकाला वाटले. माझ्या मंडपात शिवरायांचा अपमान होणार, म्हणून त्याने मंडप काढून नेला. त्याला सांगायची गरज नाही.” या विधानाने गायकवाड यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली.













