मुंबईतील पायधुनी परिसरात एका कुटुंबासाठी कलिंगड खाणे प्राणघातक ठरले. सोमवारी रात्री उशिरा कलिंगड खाल्ल्यानंतर चार जणांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी कलिंगड खरेदी करणे थांबवले आहे.
पायधुनीतील घाटी मोहल्ल्यातील मोगल उमरेट्टी इमारतीत राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाची ही दुर्दैवी कहाणी आहे. अब्दुल्ला डोकाडिया (40), त्यांच्या पत्नी नसरीन डोकाडिया (35) आणि दोन्ही मुली – आयशा (16) व झैनब (13) यांचे विषबाधेमुळे निधन झाले.
नेमके काय घडले?
रात्री १.३० वाजता, कुटुंबातील चौघांनी मिळून कलिंगड खाल्ले. ही माहिती पुढील तपासातून समोर आली आहे.
पहाटे ४ ते ५ वाजता अचानक सर्वांनाच तीव्र उलट्या आणि जुलाब होऊ लागले. परिस्थिती झपाट्याने बिघडत गेली.
सकाळी कुटुंबाच्या आरोळ्या ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या डॉ. कुरेशी यांना तातडीने बोलावण्यात आले.
प्रत्यक्षदर्शी डॉक्टरांचे हृदयद्रावक वर्णन
“मी घरी पोहोचलो तेव्हा चौघेही बेशुद्ध अवस्थेत होते. लहान मुलीची नाडीही चालली नव्हती. संपूर्ण घरात उलट्या झाल्या होत्या. आम्ही सीपीआर उपचार दिले, पण त्यांच्या शरीरात काहीतरी असे विषारी घटक शिरले होते की त्यांची प्रकृती वेगाने खालावत गेली,” अशी माहिती डॉ. कुरेशी यांनी दिली.
त्यांनी पुढे सांगितले की, “रक्तात ऍसिड तयार झाल्याचे आढळून आले. लहान मुलीला साबु सिद्दिकी रुग्णालयात तर आई-वडिलांना जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. नवऱ्याचा रक्तदाब झपाट्याने कमी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला.”
पोलिसांची चौकशी सुरु.
मुंबई पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत त्वरित तपास सुरू केला आहे. पायधुनी येथील नळबाजार परिसरातील सर्व फळविक्रेत्यांना तपासात सामील करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत कोणताही संशयास्पद मुद्दा समोर आलेला नाही.
महत्त्वाचे निरीक्षण –
-
याच परिसरात इतर कुठेही अशाच प्रकारच्या विषबाधेची तक्रार आढळून आलेली नाही.
-
फळविक्रेत्यांच्या चौकशीतूनही कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.
-
यामुळे पोलिसांना संशय आहे की, कदाचित अन्य काही कारणाने ही विषबाधा झाली असेल.
वैद्यकीय तपासणीवर भर
पोलिसांनी मृतांचा व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि हिस्टोपॅथॉलॉजी चाचणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.
नळबाजारात कलिंगड विक्रीवरच बंदी
या घटनेचा सर्वाधिक परिणाम स्थानिक फळ बाजारावर झाला आहे. पायधुनीतील नळबाजार येथील फळविक्रेत्यांनी स्वतःहून कलिंगडाची विक्री बंद केली आहे. परिसरातील नागरिक कोणत्याही फळविक्रेत्याकडून कलिंगड घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
पोलिसांचा वेगळ्या दिशेनेही तपास
घटनेनंतर पोलिसांनी केवळ कलिंगडाचाच तपास केला नसून, कुटुंबाने रात्री जेवलेल्या अन्य कोणत्या पदार्थाचीही चौकशी सुरू केली आहे. शक्यतो एखाद्या रासायनिक पदार्थाचे सेवन झाले असावे, या अंगानेही तपास सुरू आहे.
हे पण वाचा
उपचाराच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार, बेलापूरच्या बाबावर पोलिसात गन्हा दाखल … वाचा सविस्तर
नितेश राणेंना कारावासाची शिक्षा.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
संपूर्ण पायधुनी परिसरात धक्क्याचे वातावरण आहे. “एकाच कुटुंबात इतक्या क्षणात सगळे संपले हे पचवणे कठीण आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. अनेकांनी कलिंगड विकत न घेण्याचा निर्णय घेतला आहे.















Comments 1