महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वाचे घटना घडून आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी, शिवसेना आमदारांची साथ, भाजपसोबत सत्तास्थापन, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडून अजित पवार यांनी भाजपची साथ घेतली. अशातच सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी एक धक्कादायक विधान करताना मोठा इशारा दिला आहे.

ऑपरेशन टायगरबाबत शिरसाट काय म्हणाले?
दिल्लीतील राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी देताना शिरसाट म्हणाले की, आम आदमी पक्षातही मोठी फूट पडली असून सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राज्यातील ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले आहे.
शिरसाट पुढे म्हणाले,
“आमच्या संपर्कात सर्वजण आहेत, हे आम्ही नाकारत नाही. पण ऑपरेशन टायगर सांगून केलं जात नाही. योग्य निर्णय कधी घ्यायचा हा अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. योग्य वेळी राजकीय भूकंप नक्कीच पाहायला मिळेल.”
शिरसाट यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. जनतेचे लक्ष आता आगामी काळातील संभाव्य घडामोडींकडे लागले आहे.
काय आहे ‘ऑपरेशन टायगर’?
‘ऑपरेशन टायगर’ म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षांमधील विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आपल्यात सामील करून घेण्याची संभाव्य रणनीती असल्याचे समजले जाते. गेल्या काही महिन्यांपासून या ऑपरेशनच्या चर्चा सुरू आहेत.
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप अपेक्षित?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पक्षांतर सुरू आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून याचा फायदा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला झाला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. आता शिरसाट यांच्या विधानामुळे हे कयास अधिक बळावले आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी काळात राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे पण वाचा
ब्लैकमेल करून महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार… वाचा सविस्तर
फडणवीस-ठाकरे यांची मध्यरात्री भेट?
विधान परिषदेवर शिवसेनेचे उमेदवार कोण?
विधान परिषदेसाठी शिंदे शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांची नावे चर्चेत आहेत. याबाबत शिरसाट म्हणाले,
“विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या दोन जागा आहेत. यासाठी दहा-बारा इच्छुक उमेदवारांची यादी एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. मात्र, कोण पहिला, कोण दुसरा – असे कयास मीडियात लावले जात आहेत. आतापर्यंत अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने लॉबिंग करत आहे.”*
संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे की ‘ऑपरेशन टायगर’ ही केवळ चर्चा नसून वेळ येईल तेव्हा प्रत्यक्षात मोठा राजकीय बदल घडून येईल. शिंदे गटाचा विस्तार सुरूच असून भविष्यातील काही महिन्यांत राज्याच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडू शकतात. सर्वांच्या नजरा आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुढील रणनीतीकडे लागल्या आहेत.














Comments 1