
अंबेजोगाई : बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई शहरात एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेच्या शाळेत गेल्या 15 वर्षांपासून ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तपासणीत शाळेत ‘एस.आय.एन. चर्च’चे कपाट, धर्मप्रसाराची पुस्तके, जादूटोण्याच्या वस्तू आणि नशेची औषधे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
शाळेत अचानक छापा; कार्यकर्त्यांनी केली चौकशी
स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय परिसरात असलेल्या या शाळेत ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याची माहिती सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ शाळा गाठून या प्रकरणाची पाहणी केली. तपासणीदरम्यान त्यांना शाळेत एक कपाट आढळले, ज्यावर ‘एस.आय.एन. चर्च’ असे नाव कोरलेले होते.
कपाटात काय होते?
कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या कपाटात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारी पुस्तके, जादूटोण्याच्या वस्तू तसेच नशेची औषधे ठेवलेली होती. याशिवाय, शाळेशी कोणताही संबंध नसलेली एक व्यक्ती दर रविवारी येथे ख्रिश्चन प्रार्थना घेत असल्याचेही त्यांना आढळले. हा सगळा प्रकार शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच सुरू असल्याचा ठपका त्यांनी यावेळी ठेवला.
15 वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप
सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, गेल्या 15 वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. दर रविवारी ती व्यक्ती शाळेत येऊन धार्मिक प्रार्थना करते. या सगळ्याची माहिती असूनही शाळा प्रशासनाने कधीही यावर कारवाई केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
संस्थेच्या कार्यालयात धरणे आंदोलनाचा इशारा
या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी थेट शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात जाऊन संस्थाचालकांची भेट घेतली. त्यांनी पुढील दोन दिवसांत या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कारवाईची मागणी केली. तसेच, शाळेशी संबंध नसलेल्या त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही केली. कारवाई न झाल्यास संस्थेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
प्रशासनाला निवेदन; संस्थेच्या अध्यक्षांनी काय सांगितले?
सकल हिंदू समाजाने या प्रकरणाचे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय व गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहे. या घटनेची दखल घेत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले की, कोणतीही शाळा, महाविद्यालय किंवा शैक्षणिक जागा ही धर्मप्रसाराची जागा नाही. संस्थेचा स्थापनेपासूनच हा विचार असल्याचे सांगत, त्यांनी तातडीने चौकशी करण्याचे आश्वासन दिले. “आम्ही या प्रकरणात ताबडतोब चौकशी करू,” असे ते म्हणाले.
हे पण वाचा












