बीड: केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या ९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या निर्घृण हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येत्या १३ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी, १७ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख राहील. २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, २९ एप्रिल रोजी निकाल जाहीर होणार आहे.
निवडणूक बिनविरोध करून द्या – धनंजय देशमुखची मागणी
गावकऱ्यांकडून संतोष अण्णांना खरी श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध करून त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही उर्वरित १८ महिन्यांचा कार्यकाळ संतोष देशमुख यांच्या कुटुंबालाच मिळावा, अशी भूमिका मांडली आहे. अनेक ग्रामपंचायत सदस्य आणि पॅनेल प्रमुखांनी अश्विनी देशमुख यांना बिनशर्त पाठिंबा दर्शविला आहे. बीड जिल्ह्यात एकूण ८८ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू असून, यात मस्साजोगच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात काल महत्त्वाची सुनावणी पार पडली
दुसरीकडे, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. आरोपींनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता निकम यांच्याकडूनच खटला चालवला जाणार असून, आरोपींच्या मालमत्ता जप्तीचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे.
मस्साजोग गावातील निवडणुकीचे वातावरण आणि मकोका न्यायालयातील सुनावणी यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्याचेच लक्ष या घडामोडींकडे लागले आहे. आगामी काही दिवसांत निवडणूक बिनविरोध होणार की अजून कोणी रिंगणात उतरणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल….












