उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नवनियुक्त संपर्क प्रमुख व विभागीय संपर्क प्रमुखांशी ऑनलाईन बैठक घेत पक्षसंघटनेचा कसून आढावा घेतला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना थेट सुनावले – “काम नाही तर पदही नाही.” मंत्री, आमदार, खासदार अशी उपाधी बाजूला ठेवून सर्वांनी कार्यकर्त्यांप्रमाणे राबण्याचे आदेश देत शिंदे यांनी संघटनेत शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे.
प्रत्येक पदाधिकाऱ्याची वैयक्तिक चौकशी
शिंदे यांनी बैठकीत हजर असलेल्या प्रत्येक संपर्क प्रमुखाला थेट प्रश्न विचारून कामाचा तपशील मागितला.
-
आतापर्यंत किती बीएलए (बूथ लेव्हल एजंट) नेमले?
-
मतदारसंघात किती वेळा प्रत्यक्ष भेटी दिल्या?
-
किती बैठका घेतल्या आणि त्यांचे फोटो व अहवाल कुठे आहेत?
असमाधानकारक कामगिरी आढळल्यास थेट कारवाईचा इशारा देण्यात आला. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘नारळ’ देण्याचा थेट इशारा
बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला – आता प्रत्येक पदाधिकाऱ्याने नियमित कामाचा अहवाल सादर करणे बंधनकारक असेल.
शिंदे म्हणाले, “ज्यांच्याकडून कामाची अपडेट येणार नाही, त्यांना थेट ‘नारळ’ दिला जाईल.” याचा अर्थ कामगिरीत अपयशी ठरलेल्यांना पदावरून दूर करण्यात येईल, असा स्पष्ट संकेत होता. तसेच प्रत्येक बैठकीचे फोटो व तपशील दररोज सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
मतदारसंघ विभाजनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती
मतदारसंघांच्या संभाव्य पुनर्रचनेचा अंदाज बाळगून शिंदे यांनी प्रत्येक मतदार यादीनिहाय काम करण्याचे निर्देश दिले.
-
प्रत्येक मतदार यादीसाठी दोन बीएलए नेमावेत.
-
त्यांच्यासोबत नियमित बैठका घ्याव्यात.
-
स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवावा.
निवडणुका सध्या नसल्याने पक्षसंघटना बळकट करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले.
महाराष्ट्रातील ४३ हजार गावांत शिवसेनेचा ध्वज फडकणार?
एकनाथ शिंदे यांनी ठामपणे सांगितले की, “राज्यातील सर्व ४३ हजार गावांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व दिसायला हवे.”
प्रत्येक गावात पक्षाचा विस्तार व्हावा, यासाठी पदाधिकाऱ्यांना मैदानात उतरण्याचा आदेश देण्यात आला. जे पक्षाचे काम करतील, त्यांनाच भविष्यात मोठी पदे दिली जातील, असा संकेतही शिंदे यांनी दिला.
शिवसेनेची पुण्यातील कार्यकारिणी बरखास्त
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे सध्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या कामगिरीची पुर्तता करून घेत आहेत.
त्याचीच पहिली मोठी कारवाई पुण्यात करण्यात आली. शिवसेनेची पुण्यातील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. यामुळे राज्यभरातील इतर पदाधिकाऱ्यांमध्ये हादरा पसरला आहे. जे काम करतील तेच पदावर राहतील, याचीच ही स्पष्ट नांदी आहे.
एकनाथ शिंदे स्वतः घेणार सर्व पदाधिकाऱ्यांचा आढावा
आता निवडणुका नसल्याने शिंदे यांचे संपूर्ण लक्ष पक्षसंघटना वाढीकडे वळले आहे.
-
मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख अशा सर्व पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा ते स्वतः घेणार आहेत.
-
ज्यांनी काम केले नाही, त्यांना डच्चू देण्यात येईल.
-
काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना पक्षात मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील.
शिंदे यांच्या या पुनर्रचनेमुळे शिवसेनेत जुन्या कार्यकर्त्यांना आणि निवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.













