महाराष्ट्राच्या राजकारणात एका धक्कादायक घडामोडीने वातावरण तापले आहे. पवार कुटुंबाशी संबंधित या बातमीने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या आगामी निवडणुकीच्या योजनांबाबत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. बारामती मतदारसंघातून यापुढे लढणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरोधात निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.
या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत, तर विरोधकांनी सावध पवित्रा घेतला आहे.

सुप्रिया सुळे यांचे नेमके विधान काय?
सुप्रिया सुळे यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत आपल्या भावना मोकळेपणाने मांडल्या. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी यापुढे पवार कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीविरुद्ध निवडणूक लढवणार नाही.”
मागील निवडणुकीतही बारामतीतून उभे राहण्याची त्यांची इच्छा नव्हती, मात्र तेव्हा काही वेगळी कारणे होती. आता मात्र त्यांनी कुटुंबाबाहेरचा मतदारसंघ शोधण्याचा निर्णय घेतला आहे.
“बारामतीतून दुसऱ्या कुणाला लढायचे असेल तर त्यांनी लढावे. मी मात्र ही जबाबदारी घेणार नाही,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तसेच पवार कुटुंब नेहमीच एकसंध राहिले आहे आणि पुढेही राहील, यावर त्यांनी भर दिला. 2029 मध्ये ‘पवार विरुद्ध पवार’ अशी कोणतीही लढत होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुटुंब दुभंगू नये – उदय सामंत यांची प्रतिक्रिया
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या निर्णयावर आपली भूमिका मांडली. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले.
“कोणत्याही कुटुंबात वाद निर्माण होऊ नयेत, अशी माझी वैयक्तिक भावना आहे,” असे सामंत म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी – ही सर्व राष्ट्रवादी पवार कुटुंबीयांचीच आहे. सुप्रिया सुळे या संवेदनशील नेत्या आहेत आणि कुटुंब राजकारणामुळे दुभंग न होण्याची त्यांची मनोभूमिका स्तुत्य आहे.
हे पण वाचा
मुम्मका सुदर्शन अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक..
मुंबईत 1745 कोटींचे कोकेन जप्त
‘हीच आपली संस्कृती’ – चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. त्यांनी हिंदू आणि भारतीय संस्कृतीचा हवाला देत सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला दाद दिली.
“एकमेकांचा विचार करण्याची शिकवण संत-महंतांनी आपल्याला दिली आहे. एकमेकांच्या भावनांचा आदर करणे हीच आपली संस्कृती आहे,” असे पाटील म्हणाले.
आपल्या स्वार्थापेक्षा कुटुंबाचे हित पाहण्याची प्रवृत्ती ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. या दृष्टीने सुप्रिया सुळे यांनी घेतलेला निर्णय अभिमानास्पद असल्याचे पाटील यांनी सांगितले.













