मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील दीर्घप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण केले. या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि कोंडीमुक्त होणार आहे. फडणवीसांनी या प्रसंगी ‘मिसिंग लिंक’चे नाव बदलून ‘कनेक्टिंग लिंक’ ठेवण्याची मागणी केली, कारण या पुलामुळे आता काहीही ‘मिसिंग’ उरलेले नाही.

‘मिसिंग लिंक’चे ‘कनेक्टिंग लिंक’मध्ये रूपांतर
आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले, “आम्ही मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांनी जे स्वप्न पाहिले होते, ते आज पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाला ‘मिसिंग लिंक’ म्हटले जाते, पण आता काहीही हरवलेले नाही. हा ‘कनेक्टिंग लिंक’ आहे. नाव बदलले पाहिजे.” त्यांनी विशेषतः खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून सांगितले की, आत्तापर्यंत तुम्ही वाहतुकीच्या कोंडीत अडकत होता, पण आता पुण्याला जाताना तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडकावे लागणार नाही.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंजिनिअरिंग – सात देशांचा सहभाग
हा केबल-स्टे (cable-stayed) पूल केवळ देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे. फडणवीसांनी सांगितले की, या प्रकल्पात एकूण सात देशांचे सहकार्य लाभले आहे:
-
कॅनडा – पुलाचे डिझाइन
-
डेन्मार्क – महत्त्वाच्या चाचण्या
-
मलेशिया – केबलचे उत्पादन
-
स्पेन – अग्निशमन सुरक्षा चाचण्या
-
तैवान – पुलाचे आलेख
-
सिंगापूर – केबल तज्ज्ञ
-
भारत – प्रकल्प अंमलबजावणी
त्यांनी स्पष्ट केले की, पूर्वी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा वेग 130 किमी / तास होता, मात्र हा पूल 240 किमी / तास वेगाच्या वाऱ्यांनाही तोंड देण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे सुरक्षिततेबाबत कोणतीही शंका नसल्याचे त्यांनी सांगितले.
24 तास सीसीटीव्ही आणि लेन शिस्त बंधनकारक
प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. या पुलावर २४ तास सीसीटीव्ही देखरेख ठेवण्यात येणार आहे. तसेच विशेष व्हेंटिलेशन प्रणाली बसविण्यात आली आहे. लेन शिस्त पाळणे अनिवार्य असून नियम मोडणाऱ्यांना चलानीची कारवाई केली जाईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
कोरोनाकाळात या प्रकल्पाला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. राज्य सरकार आणि परदेशी सल्लागार यांना विविध आव्हानांचा सामना करावा लागला, मात्र सर्व संकटांवर मात करत प्रकल्प पूर्ण करण्यात आला. यासाठी कार्यरत संपूर्ण टीमचे फडणवीस यांनी विशेष कौतुक केले.
हे पण वाचा
प्रवरा पात्रात अवैध वाळू उपसा, गुन्हे शाखेची धडक कारवाई
मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे लोकार्पन
प्रवाशांची माफी ‘शेवटचा ट्रॅफिक जाम’
उद्घाटनाच्या दिवशी सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली. याबद्दल फडणवीस यांनी सर्व प्रवाशांची माफी मागितली. ते म्हणाले, “मला माफी मागायची आहे. आज अनेकजण ट्रॅफिक जाममध्ये अडकले, त्यांना त्रास सहन करावा लागला. पण आजपासून ही कोंडी इतिहासजमा होईल.”
खासदार सुप्रिया सुळे यांचा ट्रॅफिकमध्ये अडकलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले, “तुमच्या सरकारने जे काम थांबवले होते, ते आमच्या सरकारने पूर्ण केले आहे.” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टोला लगावला.













