11 एप्रिल रोजी गोरेगाव पूर्व येथील नेस्को प्रदर्शन केंद्राच्या हॉल क्रमांक 5 मध्ये ‘ म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे 4,000 तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाला जमनाबाई बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (JBIMS) च्या विद्यार्थ्यांचा एक गट सहभागी झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 15 ते 16 जणांच्या या गटाने कॉन्सर्ट सुरू असताना ‘एमडी’ (MD) आणि ‘एमए’ (MA) सारख्या घातक अमली पदार्थांचे सेवन केले. यापैकीच श्रेया राय (24) आणि बिस्मत सिंग अमरजीत सिंग भसीन (28) या दोघांचा मृत्यू झाला, तर शीतल साळवी (25) हिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
मद्याचा परवाना होता, पण…?
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या कार्यक्रमाला मद्य वितरणाची अधिकृत परवानगी होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कार्यक्रमाला रात्री 1:30 वाजेपर्यंत मद्यसेवा देण्याचा परवाना दिला होता. मात्र, या कार्यक्रमात केवळ मद्यच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे सेवनही करण्यात आले. त्यातही विशेष म्हणजे, हे अमली पदार्थ ‘पोर्टर’ ऍपद्वारे थेट कॉन्सर्ट स्थळी मागवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “वयाच्या 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना मद्य सेवा करण्यास बंदी असतानाही, आयोजकांनी मृत विद्यार्थ्यांसह इतरांनाही दारूची सेवा केली, जरी त्यांच्याकडे दारूचा वैध परवाना नव्हता.” या प्रकारामुळे पोलिसांनीही या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप ऐकू येत आहेत.
कॉन्सर्ट संपल्यानंतरचे धक्कादायक दृश्य
या कॉन्सर्टनंतरचे दृश्यही अतिशय धक्कादायक होते. कॉन्सर्ट संपल्यानंतर मध्यरात्री नशेत धुंद तरुण-तरुणी नेस्कोच्या पार्किंगमध्ये धिंगाणा घालताना दिसले. या नशेतल्या तरुणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये काही जण पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर चढून उच्छाद करताना दिसत आहेत. काहींच्या हातात दारूच्या बाटल्या आणि सिगारेटही दिसून येत आहेत. हे दृश्य पाहून स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर ऑरीची उपस्थिती
या प्रकरणाने आणखी एका कारणास्तव लक्ष वेधले आहे. या पार्टीत प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरी (ओरहान अवतरमानी) उपस्थित असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. पार्टीत नाचताना ऑरी या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. याआधीही ऑरीवर ड्रग्स सेवनाचे आरोप झाले आहेत आणि मुंबई पोलिसांनी त्याची इतर प्रकरणांमध्ये चौकशी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात त्याची उपस्थिती नवेच वळण देणारी ठरत आहे.
हे पण वाचा
पत्रकारांचे प्रश्न थांबता कामा नये – आमदार अमीन पटेल
मतदारांना नेण्यासाठी मुंबई बंगाल विशेष ट्रेन, भाजपची खेळी
अटकांची मालिका आणि तपासाची दिशा
वनराई पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना अटक केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ड्रग्स पुरवठादार आनंद पटेल, कॉन्सर्ट आयोजित करणाऱ्या प्रॉडक्शन हाऊसचे कर्मचारी आकाश बनमारी समाल, नेस्को प्रदर्शन केंद्राचे व्हाईस प्रेसिडेंट बालकृष्ण कुरूप, त्यांचे सहकारी सनी विनोद जैन, तसेच दोन विद्यार्थी रौनक राहुल खंडेलवाल आणि प्रतीक बिजेश पांडे यांचा समावेश आहे.
तसेच, आतापर्यंत पोलिसांनी या पार्टीत सहभागी झालेल्या 15 ते 20 जणांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणातील एका बचावलेल्या तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात माहिती दिली की, रौनक नावाच्या मित्राने तिला एक पिवळी गोळी दिली होती, ज्यानंतर तिची प्रकृती बिघडली. या मुलीने अनेक गोळ्या घेतल्याने तिला उलट्या झाल्या, ज्यामुळे तिचा जीव वाचू शकला.
या प्रकरणात पोलिसांचा तपास आता ड्रग्सच्या पुरवठा साखळीकडे वळला आहे. ड्रग्स पुरवठादार आनंद पटेल याचा कुटुंबीयांचा ‘रेशन माफिया’शी संबंध असल्याचेही समोर आले आहे. आनंद पटेल हा कल्याण-डोंबिवली भागातील कुख्यात रेशन माफिया लखन पटेल याचा मुलगा आहे, ज्याच्यावर MCOCA आणि MPDA अशा कडक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. तपास यंत्रणा आता ड्रग्स मुंबईबाहेरून आणण्यात आले होते की नाही, याबाबतही चौकशी करत आहे.
गोरेगाव नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणाने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. एकीकडे दोन तरुण जीव गमावून बसले आहेत, तर दुसरीकडे ड्रग्सचा पुरवठा कसा होतो, तरुणांपर्यंत अमली पदार्थ कसे पोहोचतात, यावर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, या प्रकरणातील सर्व आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील अद्ययावत माहिती मिळताच आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवू.














