नाशिकच्या भोंदू अशोक खरातच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने राज्य हादरून गेले असतानाच, मुंबईतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी एका भोंदू फकीरबाबाने दोन तरुणी आणि एका महिलेसोबत भयंकर प्रकार केला. तंत्र-मंत्र आणि जादूच्या नावाखाली महिलांचा गैरफायदा घेणाऱ्या या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
मुंबईतील कांदिवली परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी या भोंदू फकीरबाबाला अटक केली असून, त्याच्यावर समस्या सोडवण्याच्या नावाखाली एका तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. आरोपी फकीर महिलांना त्यांच्या समस्या सांगून उपचाराच्या नावाखाली आधी बेशुद्ध करायचा आणि नंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, असा गंभीर आरोप आहे.
आरोपी कोण आहे?
या भोंदू फकीरबाबाचे नाव इरफान नियाज अहमद असून त्याचे वय 34 वर्षे आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो मुंबईत वास्तव्यास असून स्वतःला ‘फकीर बाबा’ म्हणवतो. त्याने आपल्या या बनावट ओळखीच्या जोरावर अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवलीत राहणाऱ्या एका महिलेला या फकीरने स्वतःची ओळख ‘बाबा’ म्हणून करून दिली. तिचे पती या जगात नसल्याचे सांगून, तिच्यावर काही दोष असल्याचे त्याने बजावले. हा दोष दूर करण्यासाठी एक विशिष्ट पद्धत अवलंबणे गरजेचे असल्याचे त्या महिलेला सांगण्यात आले.
त्यानंतर बाबाने त्या महिलेसह तिच्या दोन्ही मुलींना एका विधीत सहभागी करून घेतले. या विधीदरम्यान महिला आणि तिच्या दोन मुली बेशुद्ध पडल्या. या स्थितीचा फायदा घेत फकीरने एका तरुणीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप आहे.
घटना समोर कशी आली?
बाधित मुलीने शुद्धीवर येताच हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर तातडीने कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी फकीरबाबाला 13 तारखेला अटक केली.
हे सुद्धा वाचा
गर्भपाताच्या गोळ्याच्या अति सेवनाने तरुणीचा मृत्यू… वाचा सविस्तर
buldhana news : भेंडवळच्या घटमांडणीतून पावसाचा अंदाज? श्याम मानव यांचं 80 लाखांचं आव्हान
पोलिसांची कारवाई
कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 78, 123, आणि 3(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फकीर पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणातील इतर बाधित महिला किंवा तरुणी असल्यास त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
धक्कादायक आहे अंधश्रद्धेचा हा खेळ
राज्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली अशा घटना वारंवार घडत आहेत. नाशिकच्या अशोक खरातप्रकरणी अनेक राजकीय नेते त्याच्या संपर्कात असल्याचे आरोप झाले होते. आता कांदिवलीतील या घटनेने पुन्हा एकदा भोंदू बाबा आणि फकीरांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरली आहे. महिलांनी अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.















