बारामती विधानसभा पोटनिवडणुकीने राज्यभरात राजकीय वातावरण तापवून सोडले आहे. मतदानानंतर आता पुढील वर्षांमध्ये बारामतीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत होईल की नाही, यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया देताना या चर्चाला विराम दिला आहे.

बारामतीच्या राजकारणाने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अलीकडेच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत जय पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते की, २०२९ मध्ये लोक आणि कार्यकर्ते त्यांना उमेदवार म्हणून पाहू इच्छितात, मात्र त्यांना कार्यकर्ता म्हणून काम करायचे आहे. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी बारामतीत भावनिक पातळीवर निर्णय घेत सुनेत्रा पवार यांचा प्रचार केल्याचे स्पष्ट केले. इतकेच नव्हे, तर २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ लढत होऊ शकते, अशी शक्यताही रोहित पवार यांनी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त एबीपी माझाने आयोजिलेल्या ‘माझा माझा व्हिजन’ कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
२०२९ मध्ये नेमके काय होणार? सुप्रिया सुळेंचे उत्तर
या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “२०२९ मध्ये काय होईल, आघाड्या कशा असतील, हे आत्ता सांगणे शक्य नाही. तेव्हा जे होईल ते पाहू. मात्र, एवढे निश्चित आहे की, मी कधीही ‘पवार विरुद्ध पवार’ होऊ देणार नाही. सुप्रिया सुळे कोणत्याही पवारांच्या विरोधात लढणार नाहीत. वेळप्रसंगी मी वेगळा निर्णय घेईन.”
ही प्रतिक्रिया अशावेळी आली आहे, जेव्हा जय पवार उमेदवार असतील तर दुसऱ्या बाजूने युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
विधानपरिषद निवडणूक आणि महाविकास आघाडीतील समीकरणे
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची मते मांडली. ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत काहीसे बिघाडीचे चित्र दिसू लागले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही काँग्रेस स्वतःचा उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्ही राजकारणात आहोत, एनजीओ चालवत नाही. आम्ही चर्चेने निर्णय घेतो, फोन येण्यावरून नाही. मतभेद असले तरी चर्चा सुरूच असते. काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. केरळमध्ये आम्ही काँग्रेसविरोधात लढलो, पण महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात उत्तम संवाद आहे. राहुल गांधी आणि संजय राऊत यांची केमिस्ट्री वेगळी आहे. गांधी कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्यातील संबंध अतिशय चांगले आहेत.
हे पण वाचा
निर्मळ पिंपरीत गर्भलिंग तपासणीवर पोलिसांचा छापा, डॉक्टरसह एजेंट ताब्यात..वाचा सविस्तर
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य: मुदतवाढीचा निर्णय,
पुढील राजकीय वाटचाल कशी असेल?
सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याने बारामतीच्या भविष्यातील राजकारणावर शिक्कामोर्तब झाले असले तरी, २०२९ पर्यंत राजकीय समीकरणे बदलू शकतात. मात्र, सध्यातरी सुप्रिया सुळेंनी पवार घराण्यातील कोणत्याही सदस्याविरुद्ध लढण्यास नकार दिला आहे. आता पाहणे महत्त्वाचे आहे की, येत्या काळात महाविकास आघाडीतील घडामोडी कोणते वळण घेतात आणि विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस कोणता निर्णय घेते.













