मुद्द्यांसाठी युती, पदासाठी नव्हे – बच्चू कडू
विधान परिषदेच्या निवडणुकीपार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय हालचालींना प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी विराम दिला आहे. ‘आम्ही पदासाठी युती करणारे नाही, तर मुद्द्यांसाठी युती करणारे आहोत. फक्त आमदारकीसाठी एवढा नालायक बच्चू कडू नाही,’ अशी जोरदार प्रतिक्रिया त्यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठविण्याची चर्चा रंगली होती. यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवसेनेत विलीनीकरण करण्याची अटही ठेवल्याचे बोलले जात होते. या सर्व चर्चांवर कडू यांनी आज स्पष्टीकरण देताना आपली भूमिका निर्विवाद केली.

‘फॉर्म बॅगेतच आहे, पण अटी नकोत’
पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू म्हणाले, “विधान परिषदेचा फॉर्म माझ्या बॅगेत आहे. पण मी कोणाचाही पाईक होऊन काम करणार नाही. दिव्यांग बांधव, शेतकरी, मजूर – हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यांच्यासाठी लढणे हाच माझा हेतू.”
त्यांनी पुढे सांगितले की, प्रहार संघटनेचे एक लाखांहून अधिक सदस्य आहेत. शिवसेनेतील बंडखोरीतून आपली संघटना उदयाला आली, परंतु कधीही कोणाला पाठिंबा दिला नाही किंवा घेतला नाही, असा दावा केला.
“विलीनीकरणाची चर्चा ऐकून वाईट वाटले. ही सगळी बातमीतून बातमी तयार केली गेली आहे,” असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
भाजपसोबत जाण्याचा निर्णय चुकला, हरलो स्वीकारतो
2024 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कबुली देताना बच्चू कडू यांनी सांगितले, “भाजपसोबत जाण्याचा निर्णय माझ्या मतदारांना आवडला नाही. त्यामुळे गोतावळा झाला आणि आम्ही हरलो. पण आम्ही थकलो नाही.” पराभवानंतरही आपण आपल्या मुद्द्यांसाठी लढत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंना संदेश – ‘न्याय द्यायचा असेल तर निर्णय घ्या’
प्रहारचे शिवसेनेत विलीनीकरण करण्याबाबत विचारले असता, बच्चू कडू म्हणाले, “चर्चा झाली पाहिजे, मुद्दे काय आहेत ते बघू. पण किंतू-परंतूवर आत्ता बोलायचे नाही. एकनाथ शिंदे यांना शेतकरी, मजूर, दिव्यांग यांना न्याय द्यायचा असेल, त्यांच्यासाठी काम करायचे असेल, तर निर्णय घ्यावा. एवढेच मी या पत्रकार परिषदेतून सांगतो.”
विधान परिषदेबाबत त्यांनी स्पष्ट केले की, उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेत हा विषय नव्हता. मात्र प्रस्ताव माध्यमातून कळला. “पत्रकार परिषदेनंतर जर फोन आला तर नक्की भेटायला जाऊ,” अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
शिंदेंच्या बंडात साथ, नंतर वेगळा रस्ता
प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना बच्चू कडू यांनी १९९९ मध्ये केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी त्यांनी शिंदेंना पाठिंबा दिला होता. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिंदेंपासून वेगळा रस्ता निवडला. या निवडणुकीत प्रहारने ३८ जागा लढवल्या पण सर्वच उमेदवार पराभूत झाले. पक्षाला ३ लाख ७ हजार म्हणजेच १.५५ टक्के मते मिळाली.
हे पण वाचा
निकालापूर्वीच कर्डिलेंच्या अभिनंदनाचे झळकले फ्लेक्स…. वाचा सविस्तर……
रियान परागचा व्हेपिंग व्हिडीओ व्हायरल; BCCI कडून कठोर कारवाईची शक्यता
विधान परिषद निवडणूक – प्रत्येक आमदारासाठी २८ मतांचा कोटा
विधान परिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी विविध पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे.
महायुतीचे संख्याबळ:
-
भाजप – १३१ आमदार
-
शिवसेना (शिंदे गट) – ५७ आमदार
-
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – ४० आमदार
एकूण: २२८ आमदार → ८ जागा सहज जिंकता येतील.
महाविकास आघाडीचे संख्याबळ: ४६ आमदार → केवळ १ जागा निश्चित.
भाजपकडून उमेदवारांची यादी:
-
सुनील कर्जतकर
-
माधवी नाईक
-
संजय भेंडे
-
विवेक कोल्हे
-
प्रमोद जठार
-
(पोटनिवडणुकीसाठी) प्रज्ञा सातव
बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना शेवटी विनोदी शैलीत सांगितले, “माझे नाव कडू आहे, पण चेहरा कडू राहून कसे चालेल? मी चेहऱ्यावरून आनंदी आहे.” या वक्तव्याने पत्रकार परिषदेचा समारोप झाला













