नाशिक: अलिकडच्या काळात महिलांच्या शोषणापासून ते आर्थिक फसवणुकीपर्यंतच्या गंभीर प्रकरणांमुळे चर्चेत असलेला आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला ‘भोंदूबाबा’ अशोक खरात याच्या पत्नी कल्पना खरात हिच्यावर गुन्हे दाखल आहेत. मार्च महिन्यात तिच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून ती फरार आहे. अटकेपासून वाचण्यासाठी कल्पना खरात हिने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावरील सुनावणी आता 22 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली नसल्याने सध्या तरी ती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

काय आहे प्रकरण?
शिर्डी पोलीस ठाण्यात 31 मार्च रोजी एका 55 वर्षीय शेतकऱ्याने अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. या शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी खरात यांच्याकडे 5.52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या व्यवहारात, शेतकऱ्याने सुमारे चार एकर जमीन गहाण ठेवली. सुमारे 1.5 कोटी रुपयांची परतफेड करूनही खरात दाम्पत्याने जमीन हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयात काय घडले?
फरार आरोपी कल्पना खरात हिने तिच्या वतीने राहता येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयातील सुनावणीदरम्यान, मूळ फिर्यादीच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला. त्यामुळे न्यायालयाने ही सुनावणी 22 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. या कालावधीत पोलिसांकडून कल्पना खरातचा शोध सुरूच राहणार आहे. एकूणच कल्पना खरात अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेली नाही.
हे सुद्धा वाचा
शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू….पत्नीही ठार.. वाचा सविस्तर…
समता पतसंस्था घोटाळा : अशोक खरातच्या दोन्ही मुली खातेदार, चार कोटींचे व्यवहार उघड
लुकआउट नोटीस जारी
फरार आरोपी कल्पना खरात ही परदेशात पळून जाऊ नये, यासाठी पोलिसांनी तिच्याविरोधात लुकआउट नोटीस (Look Out Circular) जारी केली आहे. यामुळे तिला देशातील कोणत्याही विमानतळावरून परदेशात पळून जाणे अशक्य झाले आहे. पोलिसांची अनेक पथके तिच्या शोधात असून, तिला लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अशोक खरातची स्थिती काय?
आरोपी अशोक खरात याच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणापासून ते आर्थिक फसवणुकीपर्यंतचे एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतांश गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथक (SIT) करत आहे. दरम्यान, अशोक खरात सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच, त्याच्या पत्नीप्रमाणेच त्याचा सहकारी अशोक तांबे हा देखील याप्रकरणी फरार आहे.













