
बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावात सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीने चुरस निर्माण केली आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या पदासाठी आजपर्यंत एकूण पाच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. सर्वात आधी अर्ज दाखल करणाऱ्या संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी सरपंचपदाच्या रिंगणात उडी घेतली. अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने ही स्पर्धा आता बिनविरोध होणार की नाही, याबाबत गावात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पाच उमेदवारांची अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण
दि. 7 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीत सरपंचपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. अश्विनी देशमुख यांच्यानंतर स्वरूपानंद देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संजीवनी देशमुख, पंजाब देशमुख तसेच करुणा स्वरूपानंद देशमुख यांनीही आपली उमेदवारी दाखल केला. यामुळे मस्साजोगच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत एकूण पाच जण रिंगणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे मागील निवडणुकीत केवळ 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी अर्ज दाखल करून निवडणुकीत एंट्री केली आहे. त्यामुळे येथील राजकीय रंगत लक्षणीयरीत्या वाढली आहे.
बिनविरोध निवडणुकीच्या अपेक्षांना बळ
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि काही ग्रामस्थांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर अश्विनी देशमुख यांनी आपला अर्ज दाखल केला होता. तसेच आमदार सुरेश धस यांनीही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे सांगितले होते. खासदार बजरंग सोनवणे यांनीही काल माध्यमांशी बोलताना ही निवडणूक बिनविरोध पार पडेल, असे म्हटले आहे.
मात्र स्वरूपानंद देशमुख यांनी अर्ज दाखल केल्याने ही अपेक्षा आता पूर्ण होणार की नाही, यावर शंका उपस्थित झाली आहे.
उमेदवारी अर्ज छाननी व मागे घेण्याची तारीख
येथील निवडणुकीच्या प्रक्रियेनुसार उमेदवारी अर्जांची छाननी 15 एप्रिल रोजी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की तिरंगी अथवा बहुरंगी लढत होणार, हे या दोन तारखांनंतर स्पष्ट होईल. दरम्यान, बीडमधील काही नेत्यांनी अद्यापही ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे.
हे पण वाचा
Amravati : अश्लील व्हिडिओ प्रकरण, 180 मुलींचा समावेश, आरोपी फरार; पोलिसांची कारवाई सुरू
स्वरूपानंद देशमुख यांचं वक्तव्य
आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी अश्विनी देशमुख यांना उद्देशून एक वादग्रस्त सल्ला दिला. “पतीची हत्या झाल्यानंतर न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावे,” असे म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “दिवंगत संतोष देशमुख यांच्या न्यायिक लढाईसाठी आजही गाव त्यांच्या पाठीशी आहे आणि उद्याही राहील. त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईपर्यंत आमचे गाव एकजूट राहील. सर्व ग्रामस्थांचा उद्देश संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्याचाच आहे.”
लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे सांगत स्वरूपानंद देशमुख यांनी स्पष्ट केले की, ते ही निवडणूक निश्चितपणे लढवणार आहेत.
पुढील काही दिवस निर्णायक
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या या पोटनिवडणुकीने संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. पतीच्या मृत्यूनंतर सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या अश्विनी देशमुख यांच्यासमोर आता आव्हान उभे राहिले आहे. येत्या 15 आणि 17 एप्रिलच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल. तोपर्यंत सर्वांच्या नजरा मस्साजोगकडे लागल्या आहेत.












