लोढा यांचा ठाकरे सेनेला प्रश्न
मुंबई महानगरपालिकेला पाठविलेल्या अधिकृत पत्रात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ब्रिटीश काळातील ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ (केईएम) हे नाव बदलून ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ ठेवण्याची शिफारस केली होती. या प्रस्तावाला पालिकेच्या आरोग्य समितीने मंजुरी दिल्यानंतर वादाला उधाण आले आहे.
विरोधकांना लक्ष्य करताना लोढा म्हणाले, “ज्या आमदारांना केईएमचे नाव बदलण्यास हरकत आहे, त्यांनी सार्वजनिकरित्या सांगावे की त्यांना किंग एडवर्ड आवडतात. देशात किंग एडवर्डची माळा का जपली जाते? इंग्लंडमध्ये त्यांचे नाव ठेवावे.” तसेच, नवीन नावातही ‘केईएम’ हे संक्षिप्त रूप कायम राहील, याची काळजी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेच्या आमदारांचा तीव्र विरोध
या नामांतराला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विरोधाची मोर्चेबांधणी केली आहे. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “केईएम रुग्णालयाचे नाव बदलल्यास इतर ऐतिहासिक वास्तूंची नावे बदलणार का?”
दुसरीकडे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी समाजमाध्यमावर आक्रमक पोस्ट लिहित मराठी जनतेला संबोधित केले. “मराठी माणसांनो, गप गार बसा… तुमची मुंबई तुमच्या हाती राहिली आहे का? ती तर लोढाची झाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच केईएमच्या अधिष्ठात्यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्याचे आवाहन करत “नाहीतर मुंबईचे लोढा मॅन्शन झालेच समजा,” असा इशाराही दिला.
डॉक्टरांची संघटनाही आक्रमक
केवळ राजकीय पक्षच नव्हे, तर केईएममधील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’नेही या नामांतराला कडाडून विरोध केला आहे. वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉक्टरांना विश्वासात न घेता असा परस्पर निर्णय घेऊ नये, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
पुढील वादाला सामोरे जाण्याची तयारी
ठाकरे सेनेने रस्त्यावरच्या लढाईची हाक दिल्यानंतर आता या वादाने आणखी तीव्र रूप धारण केले आहे. केईएम रुग्णालयाचे नामांतर हा केवळ प्रशासनिक बदल न राहता, तो मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मितेशी जोडला गेला आहे. पुढील काळात या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक हालचाली वाढण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा
राहुरीच्या बस स्थानकाचे काम दोन महिन्यात पूर्ण करावे. मा. खा. प्रसाद तनपुरे














Comments 1