मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election 2026) एकूण १० जागांसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) या जागांसाठी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू या दोन नावांची आघाडीवर चर्चा सुरू केली आहे. मात्र याच दोन्ही उमेदवारांवर स्वतः शिवसेनेतील मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांनीच जोरदार आक्षेप नोंदवला आहे. परिणामी पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

शिवसेनेतच उमेदवारांवरून मतभेद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेतून नीलम गोऱ्हे यांच्या पुनरुज्जीवनाला विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक मंत्री आणि नेत्यांचे म्हणणे आहे की, राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेसाठीही नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. तसेच बच्चू कडू यांच्या उमेदवारीबाबत तर पक्षातील नेत्यांनी “प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष म्हणून कडू यांचा शिवसेनेशी काय संबंध?” असा सवालच उपस्थित केला आहे.

बच्चू कडूंसमोर शिवसेनेची अट – ‘प्रहार’चे विलीनीकरण
बच्चू कडू यांना उमेदवारी द्यायची असेल तर शिवसेनेने एक महत्त्वाची अट घातली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कडू यांनी आपली ‘प्रहार जनशक्ती पक्षा’ची संघटना शिवसेनेत विलीन करावी, असे प्रस्तावित करण्यात आले आहे. २३ एप्रिल रोजी बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. याच भेटीत ही अट ठेवल्याचे समजते. आता कडू ही अट मान्य करतात की नकार देतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
२०२४ मध्ये बच्चू कडूंनी केला होता शिंदेंपासून फारकतीचा प्रयोग
बच्चू कडू यांनी १९९९ मध्ये ‘प्रहार जनशक्ती पक्षा’ची स्थापना केली होती. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या वेळी कडू यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी शिंदेंपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०२४ च्या निवडणुकीत प्रहार जनशक्तीने ३८ जागा लढवल्या, मात्र सर्वच उमेदवार पराभूत झाले. या निवडणुकीत पक्षाला एकूण १.५५ टक्के म्हणजेच सुमारे ३.०७ लाख मते मिळाली होती. आता विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी कडू पक्षविलीनीकरणाची ऑफर स्वीकारणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे पण वाचा
राहुरीच्या बस स्थानकाचे काम दोन महिन्यात पूर्ण करावे. मा. खा. प्रसाद तनपुरे
12 मे रोजी 10 जागासाठी मतदान, निकालही
विधान परिषद निवडणूक – १० पैकी ९ जागा महायुतीकडे?
विधान परिषदेच्या या निवडणुकीत १० जागांसाठी दोन वेळा मतदान होणार आहे. ९ जागांसाठी असलेल्या निवडणुकीत २९ आमदारांचा कोटा गाठणे आवश्यक असून, एका जागेसाठी ५१ टक्के मतांची मर्यादा राहणार आहे. तसेच प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी स्वतंत्रपणे मतदान होईल. दोन्ही मतदान एकाच दिवशी (१२ मे) असले तरी आमदारांना दोन वेळा मतदान करावे लागणार आहे. राजकीय समीकरणानुसार महायुतीला १० पैकी ९ जागा सहज जिंकता येणार असून, महाविकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे.














Comments 1