चैत्यभूमीवर अभिवादन, मान्यवरांची उपस्थिती
मुंबईतील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून अनुयायांची मोठी गर्दी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी चैत्यभूमी गाठली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. आंबेडकर यांनी देशाच्या अर्थकारणाला दिलेल्या दिशेचा गौरव केला. ते म्हणाले, “बाबासाहेबांच्या पुढाकारामुळेच भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. सोन्याला केंद्रस्थानी ठेवून अर्थव्यवस्था चालवण्याचे त्यांचे विचार अमेरिकेसह जगभर मान्य आहेत.”
तसेच, मुंबई महापालिकेने बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या स्वहस्ताक्षरातील पत्रे आणि दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन लावले आहे.
नागपूरच्या दीक्षाभूमीवर ‘जय भीम’चा गजर
नागपूरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास बाराचा ठोका बसताच ‘जय भीम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमले. संविधान चौक, इंदोरा चौक, त्रिशरण चौकासह दीक्षाभूमीवर हजारो भीमसैनिक एकवटले. फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात ही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. देशभरातून आलेल्या अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
कल्याणमध्ये संविधानाची कलमे बनली बाबासाहेबांची प्रतिमा
कल्याणमध्ये यंदा अत्यंत अनोखी कलाकृती साकारण्यात आली. भारतीय संविधानातील ४४८ कलमांचा वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हुबेहूब प्रतिमा उभारण्यात आली. ही कलाकृती समता, न्याय आणि बंधुत्वाचा संदेश देत असून, कलमांनी रेखाटलेल्या या अनोख्या कलेची सर्वत्र चर्चा आहे.
सिंधुदुर्गातील वाळूशिल्प, नंदुरबारमध्ये पेनावरील प्रतिकृती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील वाळूशिल्पकार रविराज चीपकर यांनी तीन तासांच्या मेहनतीने सुंदर वाळूशिल्प तयार केले. तर नंदुरबारमध्ये कलाशिक्षक गौरव माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी एका पेनावर बाबासाहेबांची सूक्ष्म, जिवंत प्रतिकृती साकारली. मागील वर्षी भाकरीवर चित्र काढून चर्चेत आलेल्या माळी यांनी यंदा विद्यार्थ्यांना या आव्हानात्मक कलाकृतीसाठी प्रेरित केले.
हे पण वाचा
धुळे, सोलापूर, सांगलीमध्ये आकर्षक रोषणाई आणि सेल्फी पॉईंट
धुळे शहरातील बसस्थानकाजवळ बाबासाहेबांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. सोलापूरमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकासमोर ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संदेशासह सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. सांगलीत जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते १४ फुटी पुतळ्याचे लोकार्पण फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आले.
बीडमध्ये ‘समता ज्योत रॅली’, माजलगावात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘समता ज्योत रॅली’ काढण्यात आली. सामाजिक समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचा जागर करणाऱ्या या रॅलीत राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्वांना स्वातंत्र्य आणि लोकशाही जपण्याचे आवाहन केले.
जळगावमध्ये १३५ स्क्वेअर फुट लाइटिंग स्केच, पुण्यातही उत्साह
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे जयंती उत्सव समितीने १३५ स्क्वेअर फुटांचे भव्य लाइटिंग स्केच साकारले. ड्रोन कॅमेराद्वारे हे दृश्य कैद करण्यात आले. पुणे स्टेशन परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठीही भीम अनुयायांची मोठी गर्दी झाली. महाड येथील चवदार तळे आणि क्रांती स्तंभ विद्युत रोषणाईने उजळून निघाला.













