निवृत्त न्यायाधीशांच्या बंगल्यातच अवैध गर्भपाताचा अड्डा
छत्रपती संभाजीनगर शहरातील रशीदपुरा भागात मानवतेला लाजवेल अशी संतापजनक घटना समोर आली आहे. एका निवृत्त न्यायाधीशांचा बंगला भाड्याने घेऊन अवैध गर्भपात केंद्रच चालवले जात होते. पोलिसांच्या छाप्यात या अमानुष कृत्याचा संपूर्ण पर्दाफाश झाला असून, गर्भपातानंतर अर्भक थेट खिडकीतून मागील नाल्यात फेकून दिली जात होती. भटक्या कुत्र्यांकडून या अर्भकांची विल्हेवाट लावली जात होती, ही बाब अधिक धक्कादायक आहे.
एका जागरूक महिलेच्या फोनमुळे ही कारवाई शक्य झाली. पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत चार जणांना अटक केली असून, त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बीडनंतर आता संभाजीनगरमध्ये पुन्हा खळबळ
काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील मुंडे दाम्पत्याकडून होणाऱ्या अवैध गर्भपाताचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. पैशाच्या लोभापोटी महिलांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकरणानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही तशाच प्रकारची निर्दयी कृत्ये उघडकीस आली आहेत.
फक्त १०वी उत्तीर्ण झालेल्या एका दाम्पत्याने आपल्या घरातच मिनी ऑपरेशन थिएटर उभारून गेल्या पाच वर्षांपासून अवैध गर्भपाताचा व्यवसाय सुरू ठेवला होता. हे आरोपी वारंवार घर बदलून आपला गुन्हेगारी उद्योग सुरू ठेवत होते.
बंगल्यात सापडले २४ प्रकारची मशिनरी
पोलिसांनी रशीदपुरा परिसरात घातलेल्या छाप्यात एका २४ वर्षीय विवाहितेवर गर्भपाताची प्रक्रिया सुरू असल्याचे आढळले. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्या महिलेला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले.
तपासणीदरम्यान घरात आढळलेल्या वैद्यकीय साहित्याने आरोग्य पथकही हादरले. मोठ्या रुग्णालयांमध्ये वापरली जाणारी अत्याधुनिक उपकरणे येथे होती. पोलिसांनी तब्बल २४ प्रकारची उपकरणे जप्त केली आहेत.
‘मुलगी असल्याच्या संशयावरून गर्भपात’, पण गर्भात होता मुलगा
प्राथमिक तपासात एक अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. मुलगी असल्याच्या संशयावरून हा गर्भपात करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात गर्भात मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे आरोपींच्या कृत्याची गांभीर्यता अधोरेखित झाली आहे.
तसेच, गर्भपातासाठी लागणारी औषधे कोठून आणली जात होती, याचाही तपास पोलीस करत आहेत. अर्भकांची विल्हेवाट नाल्यात फेकून लावली जात असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे.
हे पण वाचा
निकालापूर्वीच कर्डिलेंच्या अभिनंदनाचे झळकले फ्लेक्स…. वाचा सविस्तर……
मस्साजोग सरपंच निवडणूक: अश्विनी देशमुख यांचा पराभव, धनंजय देशमुख यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया
पुढील कारवाई सुरू
पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित आरोग्य यंत्रणांनाही नोटीस बजावण्यात येणार आहे. अवैध गर्भपात केंद्राविरोधात कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. स्थानिक नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.













