मस्साजोगच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत अश्विनी देशमुख यांचा मोठा पराभव
मस्साजोग (जि. बीड) – गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा ९२ मतांच्या फरकाने पराभव झाला असून, स्वरुपानंद देशमुख यांनी ही निवडणूक खणखणीत केली.
या निकालानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, विशेषतः धनंजय देशमुख आणि ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.

निवडणुकीचा थरार आणि अंतिम निकाल
मागील १५ दिवसांपासून मस्साजोगमध्ये सरपंचपदासाठी जोरदार राजकीय रंगभूमी रंगली होती. स्वरुपानंद देशमुख आणि अश्विनी देशमुख या दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. काल मतदान पार पडले तर आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली.
पहिल्या फेरीपासूनच स्वरुपानंद देशमुख यांनी आघाडी घेतली होती. तिन्ही फेऱ्यांमध्ये त्यांची ही आघाडी कायम राहिली आणि अखेर त्यांनी ९२ मतांनी विजय मिळवला. अश्विनी देशमुख यांना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा होईल, असा सुरुवातीचा अंदाज होता; मात्र तो पूर्णपणे फोल ठरला.
धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया – ‘पराभव मान्य, पण संतोष अण्णांची व्हिजन पुढे नेणार’
पराभवानंतर धनंजय देशमुख यांनी संयत भूमिका घेतली. त्यांनी नवनिर्वाचित सरपंच स्वरुपानंद देशमुख यांचा विजय मान्य करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले,
“दिवंगत संतोष अण्णा देशमुख यांचे गावासाठी जे व्हिजन होते, ते घेऊनच आम्ही पुढे काम करणार आहोत. आधी माझं आणि गावाचं संतोष अण्णांसोबत जे यशस्वी कॉम्बिनेशन होतं, ते यावेळी राहिलं नाही.”
त्यांनी पराभवाची कारणेही स्पष्ट केली. ते म्हणाले की, “संतोष अण्णांना न्याय मिळवून देण्यासाठी मला, कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वेळी मला वेळ देणे शक्य नव्हते. मला दिल्लीपर्यंत जाऊन लढा द्यावा लागला; भविष्यातही जावे लागेल. गावकऱ्यांना मला वेळ देता आला नाही, हेही पराभवाचे एक कारण आहे.”
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “आता आमचा राजकीय वाद संपला आहे. गावाच्या विकासासाठी आम्ही पुढे जाऊन मदत करण्यास तयार आहोत.”
नवनाथ वाघमारे यांचे आरोप – ‘मनोज जरांगेच्या नादामुळे झाला पराभव’
दुसरीकडे, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी थेट धनंजय देशमुख यांच्यावर निशाणा साधत म्हटले की,
“धनंजय देशमुख मनोज जरांगे यांच्या नादाला लागल्यामुळेच अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला. हा पराभव मनोज जरांगे, खासदार बजरंग सोनवणे आणि जातीयवादी विचारसरणीच्या लोकांचा आहे.”
वाघमारे म्हणाले की, “ग्रामपंचायत निवडणुकीनंतर धनंजय देशमुख यांना जिल्हा परिषदेचे डोहाळे लागले होते. ते मनोज जरांगे यांच्या सान्निध्यात राहून जातीय द्वेषाचे राजकारण करू लागले. यामुळे दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव झाला.”
त्यांनी मस्साजोगच्या मतदारांचे कौतुक करत म्हटले की, “स्थानिक लोकांनी जातीय व भावनिक राजकारणाला नकार देत स्वरुपानंद देशमुख यांना निवडून दिले. हा पराभव केवळ देशमुख कुटुंबाचा नसून, मनोज जरांगे आणि बजरंग सोनवणे यांचा आहे.”
हे पण वाचा
निकालापूर्वीच कर्डिलेंच्या अभिनंदनाचे झळकले फ्लेक्स…. वाचा सविस्तर……
ग्रामस्थांची भूमिका आणि राजकीदेखील…
या निवडणुकीने मस्साजोग गावातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. एकीकडे धनंजय देशमुख यांनी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत, तर दुसरीकडे वाघमारे यांच्या टीकेनंतर मनोज जरांगे गटाकडून काही प्रतिक्रिया येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता स्वरुपानंद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासाला काय वळण मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दरम्यान, धनंजय देशमुख यांनी ‘राजकीय वाद संपला’ असे जाहीर केल्याने तणाव कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.













