भारतीय हॉकीच्या इतिहासातील एक सुवर्णाध्याय मागे पडला आहे. 1968 च्या मेक्सिको सिटी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य आणि दिग्गज ऑलिम्पियन गुरबख्श सिंह ग्रेवाल यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. झिरकपूर (पंजाब) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
एकाच ऑलिम्पिकमध्ये भावंडांनी केली होती भारताची सेवा
गुरबख्श सिंह ग्रेवाल यांचं नाव भारतीय हॉकीच्या इतिहासात एका विशेष कारणांसाठी नोंदवलं जातं. त्यांनी आपल्या सख्ख्या भावासोबत, बलबीर सिंह ग्रेवाल यांच्यासमवेत, एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केले होते. ही दुर्मिळ कामगिरी भारतीय हॉकीच्या इतिहासात फार मोजक्या भावंडांच्या जोडीने साध्य केली आहे. 1968 मेक्सिको सिटी ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या योगदानामुळे भारतीय संघाने कांस्यपदक पटकावले होते.
खेळाडू ते प्रशासक
गुरबख्श सिंह यांनी केवळ मैदानावरच नव्हे, तर क्रीडा प्रशासनातही अमूल्य योगदान दिले. पश्चिम रेल्वेत क्रीडा अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी राजस्थानमधील गुणी खेळाडूंना ओळखून त्यांना रेल्वे हॉकी संघात संधी दिली. यामुळे अनेक प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता दाखवता आली.
मुंबईमध्ये निवृत्त झाल्यानंतरही ते क्रीडा क्षेत्राशी जोडलेले राहिले. त्यांनी मुंबई हॉकी संघाचे मानद सचिव म्हणून काम पाहिले. या भूमिकेतून त्यांनी हॉकीच्या प्रगतीसाठी अथक प्रयत्न केले. खेळाडू आणि प्रशासक अशा दोन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेलं कार्य नेहमीच स्मरणात राहील.
हॉकी इंडियाची श्रद्धांजली – ‘हॉकीचे निष्ठावंत सेवक गमावले’
हॉकी इंडियानं गुरबख्श सिंह ग्रेवाल यांच्या निधनाबद्दल सखोल दुःख व्यक्त केलं आहे. संस्थेच्या निवेदनात म्हटलं आहे की, “गुरबख्शजींनी मैदानावर खेळाडू म्हणून आणि मैदानाबाहेर मार्गदर्शक म्हणून भारतीय हॉकीची निष्ठेने सेवा केली. देशाचे प्रतिनिधित्व करण्यापासून ते ‘मुंबई हॉकी असोसिएशन’चे मानद सचिव म्हणून खेळाच्या वाढीसाठी दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील.”
हॉकी इंडियाने त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि आप्तांप्रती संवेदना व्यक्त करताना लिहिले की, “या दुःखाच्या काळात आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.”
हे पण वाचा
हप्ता न दिल्यास क्लब बंद करण्याची धमकी, हवालदाराला लाच घेताना अटक… वाचा सविस्तर
LPG gas खरेदीचा सरकारचा मोठा निर्णय…















Comments 1