शिर्डी येथील जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या आणि सध्या फरार असलेल्या कल्पना खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर राहाता सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी एक इतका गंभीर मुद्दा उपस्थित केला की, कोर्टही स्तब्ध राहिले. नोकरी किंवा व्यवसाय नसतानाही कल्पना खरात यांच्या बँक खात्यातून सात कोटी रुपयांचे व्यवहार कसे झाले? हाच तो कळीचा प्रश्न आहे.

नेमके प्रकरण काय आहे?
कॅप्टन अशोक खरात यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर शिर्डीतील एक तक्रारदार गोंदकर यांनी जुन्या जमीन व्यवहाराचा हवाला देत शिर्डी पोलिसात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणात कल्पना खरात यांचाही समावेश असून त्या सध्या पोलिसांच्या हाती लागलेल्या नाहीत. अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. न्यायालयात सरकारी पक्ष, फिर्यादी व आरोपीच्या वकिलांनी आपले मुद्दे ठामपणे मांडले.
आरोपीच्या वकिलांचा दावा: ‘पतीचे व्यवहार, पत्नीवर आरोप बरोबर नाही’
कल्पना खरात यांच्या वतीने वकील प्रशांत गिरी यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, तक्रारदाराने दीड वर्षांनंतर हा गुन्हा केवळ जुन्या व्यवहाराचा फायदा उचलण्यासाठी नोंदवला आहे. जेव्हा हा व्यवहार झाला तेव्हा कल्पना खरात त्या ठिकाणी उपस्थित नव्हत्या.
“कल्पना खरात यांचे बँक खाते त्यांचे पती अशोक खरात चालवत होते. फक्त त्यांच्या खात्यातून व्यवहार झाले म्हणून त्यांना आरोपी करता येणार नाही. त्यांनी कधीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतेही व्याज मागितलेले नाही,” असे गिरी यांनी स्पष्ट केले.
तसेच, मुक्तीयार पत्र कल्पना खरात यांच्या नावावर असले तरी पतीने केलेल्या गुन्ह्यांशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला.
सरकारी पक्षाचा पलटवार: ‘कागदपत्रांवर सही व अंगठा, मग कशी नव्हती उपस्थिती?’
सरकारी वकील बी.डी. पानगव्हाणे यांनी आरोपीच्या वकिलांच्या दाव्यांना जोरदार उत्तर दिले. त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले की, जमीन खरेदीच्या कागदपत्रांवर कल्पना खरात यांची सही आणि अंगठा आहे. याचा अर्थ त्या वेळी त्या हजर होत्या.
पानगव्हाणे पुढे म्हणाले, “खरेदी २३ तारखेला झाली, पण खरेदीखत २२ तारखेलाच का तयार करण्यात आले? तसेच, दोन टक्के व्याजदरही कल्पना खरात यांनीच ठरवला होता.” या प्रकरणात जितेंद्र शेळके आणि महेंद्र शेळके या साक्षीदारांची जबानीही नोंदवण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा
शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू….पत्नीही ठार.. वाचा सविस्तर…
भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात काय कारवाई झाली?
तपास अधिकाऱ्यांचा प्रश्न : ७ कोटींचे व्यवहार कसे?
सर्वात महत्त्वाचा मुद्दा तपास अधिकारी निवांत जाधव यांनी कोर्टात मांडला. त्यांनी कल्पना खरात यांच्या बँक खात्याचा तपशील सादर केला. त्यानुसार, खरात यांच्या ४० टक्के मालमत्तेत कल्पना खरात यांचा वाटा आहे. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयात खरेदीसाठी त्या स्वतः हजर राहिल्या आहेत.
जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला की, “कल्पना खरात या कोणतीही नोकरी करत नाहीत किंवा त्यांचा स्वतंत्र व्यवसायही नाही, अशा स्थितीत त्यांच्या बँक खात्यातून सात कोटी रुपयांचे व्यवहार झालेच कसे?” या एकाच मुद्द्याने कोर्टाचे लक्ष वेधून घेतले आहे.













