बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावाने गेल्या काही महिन्यांत राज्यभरातील लक्ष वेधून घेतले आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या दुःखद मृत्यूनंतर आता गावाच्या सरपंचपदासाठी पोटनिवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर त्यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख यांनीही नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.
थेट लढत निश्चित
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी उलथापालथ झाली. एकूण पाच उमेदवारांपैकी तिघांनी आपले अर्ज मागे घेतले. यामुळे आता अश्विनी संतोष देशमुख आणि स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख यांच्यात थेट लढत रंगणार आहे. गेल्या आठवड्यापासून राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत आता ‘देशमुख विरुद्ध देशमुख’ असा सामना पाहायला मिळणार आहे.
स्वरूपानंद देशमुख यांचा गंभीर आरोप
या निवडणुकीत उभे राहिल्याबद्दल स्वरूपानंद देशमुख यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय देशमुख यांना लक्ष्य केले आहे.
“काही लोकांच्या महत्त्वाकांक्षेमुळे मला सरपंच होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी अश्विनी देशमुख यांना तयार केले.”
तसेच, अश्विनी देशमुख यांच्यावर कुटुंबातीलच सदस्यांकडून दबाव टाकला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. स्वरूपानंद म्हणाले, “अश्विनी देशमुख यांना सर्वाधिक दबाव त्यांच्या दिराचा आहे. त्यांनीच त्यांना निवडणुकीसाठी प्रोत्साहित केले.”
समोर या, नाक घासून पाठिंबा देईन
स्वरूपानंद देशमुख यांनी आपल्यावर आरोप करणाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे. ते म्हणाले, “माझ्यावर आरोप करणाऱ्याने समोर यावे. त्यांच्याकडे सर्व यंत्रणा आहे. त्यांना वाटत असेल की मला कोणीतरी उभे केले किंवा मी कोणाच्यातरी म्हणण्यावरून उभा राहिलो, तर मी सर्व गावासमोर नाक घासून त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहे.”
ही भूमिका फार कठोर असून त्यामुळे आता स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुख यांना खरी श्रद्धांजली देणार
स्वरूपानंद देशमुख यांनी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्याबद्दल आदर व्यक्त करताना सांगितले की, “यापूर्वी गावकऱ्यांनी साडेतीन वर्ष मला काम करण्याची संधी दिली होती. पुढील 18 महिन्यांत मी संतोष देशमुख यांना खरी श्रद्धांजली वाहणार आहे. गावकऱ्यांनी पुन्हा संधी दिली, तर सरपंच देशमुख यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करेन.”
हे पण वाचा
Maharashtra MLC Election 2026: ९ जागांसाठी निवडणूक जाहीर, महाविकास आघाडीसमोर क्रॉस व्होटिंगचे आव्हान
सामाजिक वादातून माजी सरपंचाची कार जाळली ?
कुटुंबीयांची बिनविरोध निवडणुकीची इच्छा होती
दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मस्साजोगच्या सरपंचपदाची ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम प्रक्रियेत संजीवनी देशमुख, पंजाब देशमुख आणि करुणा देशमुख या तीन उमेदवारांनी माघार घेतली, तर स्वरूपानंद देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला.
विशेष म्हणजे, मागील सरपंचपदाच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांना केवळ 9 मतांनी पराभव पत्करावा लागला होता.
निवडणुकीचे वेळापत्रक
या महत्त्वाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया 28 तारखेला पार पडणार असून 29 तारखेला निकाल जाहीर होईल. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा याच दिशेने लागल्या आहेत – मस्साजोगचा पुढील सरपंच कोण?
मस्साजोग गावाची ही सरपंचपदाची निवडणूक केवळ एका ग्रामपंचायतीच्या पदासाठीची नसून ती प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. एकीकडे दिवंगत सरपंच यांच्या पत्नी असलेल्या अश्विनी देशमुख तर दुसरीकडे मागील निवडणुकीत अवघ्या 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख. आगामी 28 तारखेला या दोघांपैकी जनता कोणाला सरंक्षण देते, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.













