madha statue issue : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव गावात पुतळ्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या तणावाला आता नवे वळण लागले आहे. शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी 6 स्थानिक आरोपींना अटक केली आहे. यापूर्वीही पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, विनापरवाना पुतळे उभारल्यास थेट एफआयआर दाखल करून चार तासांतच तो हटविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

अटक केलेले सर्व आरोपी अंजनगावचेच रहिवासी
अंजनगाव येथे जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या कामात व्यत्यय आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याविरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच प्रकरणात हाके यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
-
शिवम भारत वाघमोडे (वय 27)
-
बाळू नवनाथ वाघमोडे (वय 31)
-
सतीश हनुमंत वाघमोडे (वय 25)
-
बंडू दिगंबर वाघमोडे (वय 35)
-
अरुण सुभाष वाघमोडे (वय 32)
-
नितीन वाघमोडे (वयाची माहिती समोर आलेली नाही)
हे सर्व आरोपी अंजनगाव गावातील स्थानिक रहिवासी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पुतळा प्रकरणी कारखाना सील, 8 गुन्हे दाखल
अंजनगाव पुतळा प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. यापूर्वीच अंजनगावला पुतळा पाठविणाऱ्या बाळराजे आवारे यांचा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना पोलिसांनी सील केला होता. तसेच, या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 8 विविध गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
1 एप्रिलपासून गावात तणावाचे वातावरण
मौजे अंजनगाव, तालुका माढा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याच्या मुद्द्यावरून 1 एप्रिल 2026 पासून गावात तणाव निर्माण झाला आहे. गावातील दोन गटांनी एकमेकांच्या समोर आंदोलने सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तडजोडीचा मार्ग स्वीकारत जागेची मोजणी करून घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मोजणी करताना अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करून अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी अजून कोणतेही मोठे आरोपी फरार असल्याची माहिती नसली तरी, तपासाची चक्रे वेगाने फिरत असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने गावातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे.
हे पण वाचा
Supriya Sule : अजितदादांचा फोन सापडला, पण ब्लॅक बॉक्सचं काय? सुप्रिया सुळेंची तपास यंत्रणांवर नाराजी













