पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावाने आज एका अमानवी घटनेने हादरून गेले आहे. चार वर्षांच्या एका निरागस चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्दयपणे हत्या करण्यात आली. या प्रकारानंतर ग्रामस्थांनी संतापाची भरती ओढवत गावात कडक बंद पुकारला आहे. नराधम आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांनी ‘आरोपी आमच्या हाती द्या, आम्ही त्याचा निकाल लावू’ अशी भूमिका घेतली आहे.

वासरू दाखविण्याचे आमिष दाखवून गोठ्यात नेले
आरोपीने चिमुकलीला ‘वासरू दाखवतो’ म्हणून हात धरून गावातील एका गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आणि नंतर दगडाने तिला ठेचून तिचा खून केला. मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवण्यात आला होता. ही संपूर्ण घटना दुपारच्या सुमारास घडली.
सीसीटीव्ही फुटेजने उलगडला गुन्हा
चिमुकली दुपारी गायब झाल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर तिचा मृतदेह गोठ्यात आढळून आला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी तिला गोठ्याच्या दिशेने नेताना स्पष्टपणे दिसून आला. हे फुटेज समोर आल्यानंतर संपूर्ण कुटुंब हादरून गेले.
ग्रामस्थांचा संताप आणि निषेध मोर्चा
महिलांनी केली फाशीची मागणी
या जघन्य प्रकाराने गावातील महिला विशेषतः भावूक झाल्या आहेत. चिमुकलीला खेळताना, बागडताना पाहणाऱ्या अनेक महिलांनी रस्त्यावर उतरून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. “आमची सुरक्षा करता येत नसेल तर ‘लाडकी बहीण’ योजनेचा काय उपयोग?” असा सवालही महिलांनी उपस्थित केला.
भैरवनाथ मंदिरापासून सुरू झाला मोर्चा
आज सकाळी गावातील भैरवनाथ मंदिराजवळून ग्रामस्थांचा मोर्चा सुरू झाला. संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांना घेराव घालत ‘आरोपी आमच्या हाती द्या’ अशी घोषणाबाजी केली. काल रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी ग्रामस्थांना समजूत काढली होती आणि मोर्चा मागे घेण्यात आला होता, मात्र आज पुन्हा निषेधाला सुरुवात झाली आहे.
हे पण वाचा
संघर्षातून घडलेला महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर…आ. अमोल खताळ
डोकाडिया कुटुंब मृत्यू प्रकरणात फॉरेन्सिक अहवाल धक्कादायक
आजीच्या घरी सुट्टीसाठी आली होती चिमुकली
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चार वर्षांची चिमुकली उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या आजीच्या घरी आली होती. तिच्या कुटुंबीयांनी अशा भीषण प्रकाराची कल्पनाही केली नव्हती. सध्याच्या निषेध मोर्चात ग्रामस्थांनी आरोपीला त्वरित फाशी देण्याची मागणी केली आहे तसेच स्थानिक प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली आहे.
पोलिसांची कारवाई आणि पुढील दिशा
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. दरम्यान, गावातील तणाव पाहता पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या मागण्या आणि आरोपीवर कठोर कारवाईचा दबाब लक्षात घेता, या प्रकरणाकडे राज्यभरातून लक्ष लागून राहिले आहे.













