निरुपम यांचे दहाव्या उमेदवाराचे संकेत, ठाकरेंवर टीकेची झोड
महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election 2026) नऊ जागांसाठीच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ दोन दिवसांची वेळ शिल्लक असतानाच, शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते संजय निरुपम यांनी मोठा दावा ठोकत राजकीय वातावरण तापविले आहे. दहावा उमेदवार मैदानात उतरवण्याची त्यांनी हिंट देताच, सत्ताकेंद्रात खळबळ उडाली आहे.

“दहावा उमेदवार कोणाच्याही जोडीला राहणार नाही”
संजय निरुपम म्हणाले की, दहावा उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमचे दोन उमेदवार निश्चितच बहुमताच्या जोरावर विजयी होतील. मात्र, उर्वरित मते आणि विविध छोटे पक्ष, अपक्ष आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. पक्षश्रेष्ठींनी असे ठरविले की आणखी एक उमेदवार उभा करायला हवा, तर त्यात काही अडथळा नाही.
त्यांनी स्पष्ट केले की, हा दहावा उमेदवार इतर कुठल्याही उमेदवाराला (उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीला) जोडून राहणार नाही. तो फक्त आपल्याच संख्याबळावर उभा असेल. आम्हाला आमच्या आकडेवारीवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर कोण आहे, याचा फारसा फरक पडत नाही. दहाव्या उमेदवारीबाबत तयारी सुरू झाली आहे का, याची माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंवर निरुपम यांची जोरदार टीका
विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना बिनविरोध निवडून आणण्याची कुठलीही आवश्यकता नसल्याचे मत निरुपम यांनी व्यक्त केले. त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात स्पष्ट फरक सांगितला.
“शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर उमेदवार न देण्याची भूमिका योग्य ठरू शकते. मात्र, उद्धव ठाकरे एवढे मोठे नेते नाहीत की त्यांच्यासाठी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध केली जावी,” असे निरुपम यांनी ठणकावून सांगितले.
महाविकास आघाडीत अद्याप संभ्रम कायम
विधान परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीकडे आकडेवारीचे पारडे जड असले तरी, विरोधी महाविकास आघाडी (मविआ) मात्र संभ्रमात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी उद्धव ठाकरे यांनीच उमेदवारी घ्यावी, असा आग्रह धरला आहे. मात्र, ठाकरे स्वतः यास इच्छुक नसल्याचे सांगितले जाते.
जर उद्धव ठाकरे यांनी नकार दिला, तर अंबादास दानवे, सुषमा अंधारे किंवा विनायक राऊत यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा
गुप्त धनाच्या लालसेचा खेळ, खड्ड्यामुळे गावात भीतीचे वातावरण .. वाचा सविस्तर
विवेक कोल्हे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत भेट, विधान परिषद उमेदवारीच्या चर्चांना उधाण
महायुतीचे वर्चस्व : आठ जागा सहज?
महायुतीचे पारडे भारी असून, त्यांना एकूण आठ जागा सहज मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच शिंदे गटाने दहावा उमेदवार उभा केल्यास मविआच्या एकमेव शक्य असलेल्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलू शकते.












