मुख्यमंत्र्यांची भेट का महत्त्वाची?
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी प्रकाशित होण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच ही भेट झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीला विशेष महत्त्व दिले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून विवेक कोल्हे यांच्या नावाची उमेदवारीच्या संदर्भात सर्वत्र चर्चा सुरू होती. याआधीच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हे यांच्या विधान परिषदेसंदर्भात भाष्य केले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांसोबत झालेली ही भेट अधिक लक्षणीय ठरत आहे.
कोल्हे परिवाराचे अहिल्यानगरमध्ये वर्चस्व
अहिल्यानाग्र जिल्ह्यात कोल्हे परिवाराचा मोठा प्रभाव आहे. विवेक कोल्हे हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू असून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे आणि कोल्हे यांच्यातील जुना राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे.
विधानसभा निवडणुकीचा काळही लक्षणीय
गेल्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने कोपरगावमधून आशुतोष काळे यांना उमेदवारी दिली होती, त्यावेळी भाजपने विवेक कोल्हे यांना महायुतीचे धोरण पाळण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हे यांना थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घालून दिली होती. आता पुन्हा एकदा कोल्हे यांच्यामध्ये भाजप प्रवेशाची चर्चा आहे.
भाजपचे उमेदवार निवडीचे धोरण
भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी नवे धोरण स्वीकारले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी संधी देण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याऐवजी संघटनेत कार्यरत असलेल्या नव्या चेहऱ्यांना तसेच जातीय समीकरणे व्यवस्थित साधणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यावर भाजपचा भर आहे.
संभाव्य उमेदवारांची यादी
भाजपच्या विधान परिषदेच्या संभाव्य उमेदवारांमध्ये कोल्हे यांच्यासह अन्य अनेक नेत्यांचा समावेश आहे. या यादीत माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे यांचा समावेश आहे.