महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तिपीठात मोठा भ्रष्टाचाराचा आरोप
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नाशिकजवळील सप्तशृंगी गडावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारात मोठा बेजबाबदपणा उघडकीस आला आहे. मंदिरातील सौंदर्यीकरणासाठी वापरण्यात आलेल्या चांदीत सुमारे २२ किलो ४९० ग्रॅमची तफावत आढळून आली आहे. या प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छिराम यांनी या प्रकरणी प्रशासनाकडे ठोस पुराव्यांसह तक्रार दाखल केली होती. तपासणीत असे उघड झाले की, मंदिरातील नक्षीकामासाठी मूळ नोंदीनुसार एकूण ४०६ किलो चांदीचा वापर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष हस्तगत केलेल्या चांदीचे वजन केले असता ते केवळ ३८३ किलो ७०३ ग्रॅम एवढेच असल्याचे स्पष्ट झाले.
याचा अर्थ सुमारे २२ किलो ४९० ग्रॅम चांदी बेपत्ता असल्याचे उघड झाले आहे. ही रक्कम बाजारभावानुसार कोट्यवधी रुपयांची असल्याचे सांगितले जात आहे.

प्रशासनाचे कडक पावले
२५ मार्च २०२६ रोजी ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने त्वरित कार्यवाही सुरू केली. हे प्रकरण नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तसेच विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सोपविण्यात आले आहे.
अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ यांनी यासंदर्भात लेखी आदेश काढले आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि ट्रस्टच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना सखोल अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय
ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी चौकशी समितीसमोर दिलेल्या जबाबात मोठा धक्कादायक खुलासा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंदिरातील चांदी काढताना आवश्यक ती पंचनामा प्रक्रिया पार पडली नाही. चांदीचे अधिकृत वजन करणे, तिची नोंद करणे आणि सीलबंद करण्याची सर्व प्रक्रिया नियमानुसार झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
यामुळे हा केवळ तांत्रिक घोळ नसून सुनियोजित पद्धतीने ही चांदी अपहार करण्यात आल्याचा संशय बळावला आहे.
हे पण वाचा
कल्पना खरात यांचा अटक पूर्व जमीन राहता न्यायालयाने केला नामंजूर… वाचा सविस्तर….
२०२९ मध्ये पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’?
सातत्यपूर्ण आंदोलनानंतर प्रकरणाला वाचा
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते छगन जाधव, माजी सरपंच बेबीबाई जाधव यांनी विधीज्ञ सुरेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी २०२६ पासून या प्रकरणाविरोधात आंदोलन सुरू केले होते. त्यांनी वारंवार पाठपुरावा केला, मात्र सुरुवातीला प्रशासनाकडून त्यांना योग्य दाद मिळत नव्हती.
अखेर राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हलली आहे. या आंदोलनामुळेच या प्रकरणाला वाचा फुटल्याचे सांगितले जात आहे.
फौजदारी कारवाईची मागणी
तक्रारदारांनी या प्रकरणात ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच जी चांदी अपहार करण्यात आली आहे, तिची संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. आता सर्वांचे लक्ष या चौकशी अहवालाकडे लागले आहे. प्रशासनाने या प्रकरणाचा त्वरित तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.












