भारतीय संगीत क्षेत्रातील एक अविस्मरणीय अध्याय काल (रविवार, १२ एप्रिल) संपुष्टात आला. दैवी सुरांची साथ लाभलेली, थोरांपासून सामान्यांपर्यंत सर्वांच्या मनात घर करणारी स्वरांची सम्राज्ञी आशा भोसले यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ठसकेबाज लावणी असो, उत्फुर्त चालीचे भावगीत असो किंवा ‘मेरा कुच्छ सामान’ सारखे अमर गीत – प्रत्येकाला आपल्या अलौकिक आवाजाने अजरामर करणाऱ्या या महान गायिकेचे काल निधन झाले.
गेल्या शनिवारी सायंकाळी अचानक अस्वस्थता वाढल्याने आशाताईंना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती ढासळत गेली आणि रविवारी बहुआयामी अवयव निकामी झाल्याने (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) त्यांनी जगाचा निरोप घेतला. डॉक्टरांनी ही माहिती देताच चाहत्यांनी मोठी हळ हळ व्यक्त केली .
अंत्यदर्शनासाठी मुंबईत चाहत्यांचा ओघ
आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव आज (सोमवार, १३ एप्रिल) सकाळपासून कासा ग्रँडे येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत चाहत्यांना श्रद्धांजली वाहण्याची संधी देण्यात आली आहे. या वेळेत मोठ्या संख्येने नागरिकांनी घराबाहेर गर्दी केली. बॉलिवूडपासून संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार, गायक, संगीतकार आणि चाहते शेवटचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत. प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनीही सकाळी अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली.
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय आणि सांस्कृतिक नेत्यांनी कालच आशाताईंच्या पार्थिवाला मानवंदना दिली. राज्य सरकारने त्यांना पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी ३.३० वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि शिवाजी पार्क येथील भागोजी किर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अंत्ययात्रेचा मार्ग आणि सुरक्षा व्यवस्था
आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेचा मार्ग खालीलप्रमाणे असेल:
कासा ग्रँड एक्झिट गेट → डावे वळण → पेनिन्सुला सिग्नल → उजवे वळण → गणपतराव कदम मार्ग → श्रीराम नाका → वरळी नाका → उजवे वळण → डॉ. ॲनी बेझंट मार्ग → पोद्दार जंक्शन → ग्लॅस्को जंक्शन → सास्मिरा जंक्शन → हार्डीकर जंक्शन → सेंचुरी जंक्शन → किस्मत जंक्शन → हत्तीचा पुतळा → सिद्धिविनायक मंदिर → काशिनाथ धुरू → कीर्ती कॉलेज → सूर्यवंशी हॉल → डावे वळण → स्मशानभूमी.
या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोठ्या संख्येने चाहते आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याने पोलिसांनी सुरक्षा घट्ट केली आहे.
हे पण वाचा
स्मशानभूमीत विशेष व्यवस्था; LED स्क्रीन आणि गाणी
मुंबई महानगर पालिकेने अंत्यविधीस्थळी ५०० हून अधिक विशिष्ट व्यक्तींसाठी आसनांची व्यवस्था केली आहे. शिवाजी पार्क परिसरात LED स्क्रीन लावण्यात आल्या आहेत, ज्यावर आशाताईंची अजरामर गाणी लावून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. अंदाजे १० ते १२ हजार लोक अंत्यदर्शनासाठी येतील, असा पालिकेचा अंदाज आहे. पार्थिव स्मशानभूमीत आल्यानंतरही थोड्या वेळासाठी चाहत्यांसाठी अंत्यदर्शनाची सोय करण्यात आली आहे.
आशा भोसले यांच्या निधनाची बातमी समजताच केवळ महाराष्ट्र किंवा भारतच नव्हे, तर जगभरातील त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांनी शोक व्यक्त केला. राजकारणी, संगीतकार, अभिनेते आणि सामान्य रसिक या सर्वांनी सोशल मीडियावरून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. स्वरांची ही सम्राज्ञी कायम सर्वांच्या हृदयात अमर राहील.













