बारामती : काँग्रेस पक्षाने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत हा निर्णय स्पष्ट केला. यामुळे आता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजयाचा रस्ता सोपा झाला आहे.
उमेदवारी मागे घेतल्याची अधिकृत माहिती
गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “बारामतीच्या सर्व उमेदवारांशी आम्ही व्हिडिओ कॉल करून संवाद साधला आणि त्यांना हा निर्णय सांगितला आहे. 2029 मध्ये बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार असेल, हा विश्वास मी तुम्हाला देतो.”
काँग्रेसने या पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना आपला उमेदवार जाहीर केला होता. मात्र, आता ही उमेदवारी मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) विरोधात लढत राहिलेली नाही.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या फोनवरून काय म्हणाले सपकाळ?
एक महत्त्वाची गोष्ट सपकाळ यांनी उघड केली की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना फोन आला होता. पण त्यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. पण त्यांचा फोन आला म्हणून आम्ही हा निर्णय घेतला नाही आहे. त्यांच्याशी आमचे टोकाचे मतभेद आहेत.”
नेत्यांच्या विनंतीनंतर काँग्रेसचा निर्णय
हा निर्णय घेताना सपकाळ यांनी अनेक नेत्यांच्या विनंतीचा उल्लेख केला:
-
रोहित पवार: आज सकाळीच आमदार रोहित पवार यांनी सपकाळ यांची भेट घेऊन उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली.
-
शरद पवार व सुप्रिया सुळे: या दोन्ही नेत्यांनीही काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
-
सुनेत्रा पवार: त्यांनी स्वत: हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून विनंती केली. तसेच दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेतली.
हे पण वाचा
भाजपवर टीकेची झोड
उमेदवारी मागे घेताना सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपसारख्या विषारी, विखारी पक्षासोबत राहू नये. सत्तेसाठी लाचार होऊ नये. अजितदादा एक मोठे नेते होते.”
तसेच त्यांनी सरकारवर आरोप करताना म्हटले की, “हा अपघात, घातपात यामध्ये गुन्ह्याची नोंद होत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. सरकार काहीतरी लपवाछपवी करत आहे.”
सपकाळ यांनी स्पष्ट केले की, “एका वैचारिक भूमिकेतून आम्ही भाजपच्या विरोधात ही पोटनिवडणूक लढत होतो. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांची टीम बनला आहे. अजित पवार हे राज्याचे नेते होते आणि त्यांच्यासोबत आम्ही काम केले आहे. त्यामुळे भावनिक भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हाला माघार घेण्याची विनंती करण्यात आली.”














