मुंबई, २ मे २०२६ – दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात गेल्या आठवड्यात चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचे गूढ आणखीच वाढले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) तपासणीत कलिंगडात कोणतीही भेसळ आढळली नसली, तरी फॉरेन्सिक अहवालात मृतांचे अंतर्गत अवयव हिरवट पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एफडीए अहवालात काय निष्कर्ष?
डोकाडिया कुटुंबाच्या घरातून अन्न व औषध प्रशासनाने तब्बल ११ विविध नमुने जप्त केले होते. यामध्ये कलिंगड (टरबूज), बिर्याणी, माठातील पाणी, फ्रिजमधील पाणी, कच्चा व शिजवलेला भात, कच्चे व शिजवलेले चिकन, खजूर आणि मसाले यांचा समावेश होता.
प्रयोगशाळेतील तपासणीअंती एफडीएने स्पष्ट केले की कलिंगडात रंग, गोडवा किंवा आकार वाढविण्यासाठी कोणतेही कृत्रिम रसायन किंवा रंग वापरण्यात आलेला नाही. तसेच इतर खाद्यपदार्थांमध्येही कोणताही प्रकारची भेसळ आढळली नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
यामुळे विषारी कलिंगड खाल्ल्याने या कुटुंबाचा मृत्यू झाल्याची आतापर्यंतची शक्यता फेटाळली गेली आहे.
फॉरेन्सिक चाचणीत धक्कादायक माहिती
आता मृतांच्या फॉरेन्सिक चाचणीचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार सर्व मृतांचा मेंदू, हृदय आणि आतडी हिरवट पडल्याचे निदान झाले आहे.
विषप्राशनाचा संशय वाढला
शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सामान्य अन्न विषबाधेपेक्षा ही स्थिती पूर्णपणे वेगळी आहे. एकाच वेळी शरीरातील अनेक अवयवांचा रंग बदलणे हे लक्षण विष शरीरात पसरल्यानेच दिसून येते. त्यामुळे आता कुटुंबातील मृत्यू हा विषप्राशनामुळे झाल्याची शक्यता अधिक बळावली आहे.
हे पण वाचा
संघर्षातून घडलेला महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर…आ. अमोल खताळ
प्रकरणाचे गूढ कायम
कलिंगडात भेसळ नसल्याने मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एफडीएचा अहवाल जरी साफ करणारा असला, तरी फॉरेन्सिक निष्कर्ष कोणत्या दिशेने संकेत करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील तपासासाठी बॅक्टेरियल चाचण्या आणि मृतांच्या इतर वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल येणे अपेक्षित आहे. तोपर्यंत या प्रकरणातील रहस्य कायम आहे. पोलिसांनी सर्व कोनातून तपास सुरू ठेवला आहे.













