महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. राज्यातील नऊ आयपीएस अधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाचे आदेश सोमवारी (ता. २०) जारी करण्यात आले. यात सर्वाधिक चर्चेत असलेली बदली म्हणजे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची. त्यांची सांगली जिल्ह्यात नेमणूक करण्यात आली आहे. ही बदली अशा वेळी झाली आहे, जेव्हा सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील वादानंतर दोषी यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली होती.

राजकीय दबावानंतर बदलीचा निर्णय
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान पालकमंत्री शंभुराजे देसाई यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. तसेच, पोलिसांच्या सहाय्याने भाजपने जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज केल्याचे आरोपही ऐकू येत होते. हे आरोप महायुतीतील सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लावले होते. या पार्श्वभूमीवर विधिमंडळात विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी तुषार दोषी यांच्यावर कारवाईची शिफारस केली होती.
शिंदे गटाच्या शिवसेनेने तुषार दोषी यांची बदली हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला होता. आता शिंदे यांच्या पक्षाच्या नाराजीची दखल घेतल्याचे संकेत असतानाच ही बदली करण्यात आली आहे.
शिक्षा की बक्षीस? उपस्थित प्रश्न
तुषार दोषी यांची सांगली जिल्ह्यात बदली झाली असली, तरी सांगली हा सातारापेक्षा मोठा आणि अधिक महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. त्यामुळे ही बदली त्यांच्या ‘कामगिरीची शिक्षा’ आहे की ‘बक्षीस’ – याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. काही वर्तुळांत ही बदली पदोन्नतीच्या समांतर असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.
तुषार दोषी यांच्या जागी पुणे क्राईम ब्राँचचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, निखिल पिंगळे यांच्यावरही रोहिणी खडसे यांचे पती यांच्या प्रकरणी आरोप झाले होते.
हे पण वाचा
सामाजिक वादातून माजी सरपंचाची कार जाळली ?
beed news : मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक : अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख थेट लढत
तुषार दोषी हे महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. सध्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान झालेल्या गदारोळामुळे आणि त्यानंतरच्या राजकीय संघर्षामुळे ते चर्चेत आले. विधानपरिषदेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. उपसभापती निलम गोऱ्हे यांनी निलंबनाचे आदेश दिले होते, मात्र नंतर राम शिंदे यांच्या आदेशानंतर हे निलंबन रद्द करण्यात आले आणि ते पुन्हा सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयात रुजू झाले.
यापूर्वी जालना येथील मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमार प्रकरणातही तुषार दोषी यांचे नाव चर्चेत आले होते. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी मंत्री शंभुराजे देसाई यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी पोलीस यंत्रणेने निष्क्रियता दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.














